
नागपूर : नागपूर-अमरावती मार्गावर वाडी परिसरात गुन्हे शाखेने कारवाई करत बनावट देशी दारूची मोठी खेप पकडली. पोलिसांनी ट्रकमधून तब्बल ३९ हजार बाटल्या जप्त केल्या असून, दारू, ट्रक आणि इतर साहित्याची एकूण किंमत सुमारे २८ लाख ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
गुन्हे शाखेच्या वाहनचोरी पथकाला अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाडी हद्दीत सापळा रचून एमएच-४०/सीडी-१५९१ क्रमांकाचा ट्रक अडवला. ट्रकच्या वरच्या भागात प्लास्टिक स्क्रॅप ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे समोर आले.
ट्रकमध्ये ‘रॉकेट’ कंपनीच्या देशी दारूचे ३९० बॉक्स आढळले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिलीच्या १०० बाटल्या होत्या. जप्त दारूची किंमत सुमारे १५ लाख ६० हजार रुपये आहे.
या प्रकरणी ट्रक चालक अब्दुल तहसील अब्दुल ऑफिस (३४) याला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत ही खेप धुळे येथून नागपूरमार्गे गडचिरोलीच्या अहेरीकडे नेली जात असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील संशयित अंकुश ऊर्फ अण्णा सुधाकर कुंचनवार फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.




