
नागपूर, : भारतीय संस्कृतीत ‘माता’ आणि ‘माती’ या दोन्ही गोष्टी नवनिर्मितीचे प्रतीक मानल्या जातात. माता म्हणजे स्त्री, जिला निसर्गाने नवजीवन देण्याचे वरदान दिले आहे; तर मातीमध्ये बीज पेरले की नवीन अंकुर जन्माला येतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवत आत्मविश्वासाने जीवन जगावे आणि पुढील पिढीला चांगले संस्कार देण्याची जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर आणि तेली समाज सभेच्या संयुक्त विद्यमाने “मातृत्व आणि कर्तृत्व स्वामिनी तुला प्रणाम” या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नागपूरमधील संताजी सभागृह, बुधवार बाजार परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांचनताई गडकरी होत्या, तर धरमपेठ मल्टीस्टेट सहकारी बँकेच्या अध्यक्षा सारिका पेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक मानकर, डॉ. संजय उगेमुगे, सचिव डॉ. राजू मिश्रा, तेली समाज सभेचे अध्यक्ष नानाभाऊ ढगे, कोषाध्यक्ष हरिभाऊ किरपाने, सचिव सुरेश साठवणे तसेच स्पर्धेच्या परीक्षक सुजाता नागपुरे आणि निकिता ढाकुलकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकल्याण समितीच्या सभापती सारिका नंदुरकर, नगरसेविका मंगल मस्के, प्राचार्य डॉ. शुभा मिश्रा आणि प्रशासकीय सेविका अर्चना श्रीवास्तव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ महिलांसाठी आयोजित समूह नृत्यनाटिका स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सारिका पेंडसे यांनी महिलांनी परस्परांना साथ देत प्रोत्साहन दिल्यास समाजात महिलांचे स्थान अधिक बळकट होईल, असे सांगितले. महिलांनी एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारत एकमेकींना पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगला गावंडे यांनी केले. प्रास्ताविक दिलीप कातरकर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन वंदना वारके यांनी केले.
समूह नृत्यनाटिका स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे –
प्रथम – छत्रपती ज्येष्ठ नागरिक मंडळ, छत्रपती नगर, नागपूर
द्वितीय – श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ, मनीष नगर, नागपूर
तृतीय – राणी झाशी महिला मंडळ, मानेवाडा, नागपूर
उत्तेजनार्थ प्रथम – संघर्ष महिला मंडळ, लोकसेवा नगर, नागपूर
उत्तेजनार्थ द्वितीय – मुक्ताई महिला भजन मंडळ, खरबी रोड, नागपूर.








