Published On : Fri, Oct 26th, 2018

जनतेचा विश्वासघात करणारे मस्तवाल सरकार गाडून टाका! : खा. अशोक चव्हाण

Advertisement

नांदेड: निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन देशातील व राज्यातील जनतेची फसवणूक भाजप शिवसेना केली आहे. महापुरुष व महिलांबाबत बेताल वक्तव्ये करून त्यांचा अवमान करणा-या या मस्तवाल सरकारला गाडून टाका असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. ते नायगाव येथे जनसंघर्ष सभेत बोलत होते.

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंर्घष यात्रा आज सकाळी नरसी येथे पोहचली यात्रेत सहभागी नेत्यांनी येथील बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर नरसी येथून हजारो दुचाकींच्या रॅलीसोबत जनसंघर्ष यात्रा नायगाव येथे पोहोचली. नायगाव येथील हनुमान मंदिराजवळील मैदानावर भव्य जनसंघर्ष सभा पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात , आ. नसीम खान, हर्षवर्धन पाटील, आ.मधुकर चव्हाण, आ.बस्वराज पाटील, आ.वसंतराव चव्हाण, माजी आ. हनुमंतराव बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, सचिव आबा दळवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

यावेळी बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफैर टीका केली. ते म्हणाले की, भाजपने निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन लोकांची मते घेतली. पण सत्तेवर आल्यावर आता भाजपच्या नेत्यांना या आश्वासनांचा विसर पडला आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १६ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी जाहीर करून दीड वर्ष उलटले. अद्याप शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आमच्या काळात आम्ही शेतक-यांचे 72 हजार कोटींचे कर्ज एका दिवसात माफ करून शेतक-यांचे सातबारे कोरे केले होते.

दरवर्षी २ कोटी तरूणांना नोक-या देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. साडेचार वर्षात नऊ कोटी तरूणांना नोक-या मिळायला हव्या होत्या मात्र ९ लाख तरूणांनाही नोक-या मिळाल्या नाहीत. लाखो बेरोजगार तरूण नोकर भरतीकडे डोळे लावून बसले आहेत मात्र सरकार एमपीएससीच्या फक्त ६०ते ६५ जागांसाठी भरती करत आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तरूण पिढीचे भविष्य अंधकारमय झाले आहे. महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनावर अन्याय्य कर लावून सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे.

शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी सरकारी कर्मचारी असे सर्वच घटकांची फसवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप पैसा कमावला आहे. या पैशाच्या मस्तीमुळे भाजपचे नेते आमच्या आया बहिणी व महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून त्यांचा अवमान करत आहेत. या मस्तवाल सरकारला आगामी निवडणुकांमध्ये गाडून टाका असे आवाहन खा. चव्हाण यांनी उपस्थितांना केले.

ते पुढे म्हणाले की, भाजप सरकार मराठवाड्यावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. मराठवाड्यातील प्रकल्पांना निधी दिला जात नाही. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. तरीही सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही तरी सरकार मदत करत नाही. नांदेड जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ जन्य परिस्थिती असताना पालकमंत्री कुठे आहेत? हे काही कळत नाही ते फक्त १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच येतात. सरकारने मोठा गाजावाजा केलेली जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त शिवार झाली आहे.

मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याऐवजी सरकार मराठवाड्याचे पाणी इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करत आहे पण आपण ते होऊ देणार नाही. शिवसेनेचे नेते सत्तेत बसून सरकारवर टीका करतात हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे. राज्याच्या दुरावस्थेला भाजपइतकीच शिवसेनाही जबाबदार आहे. आपण दोघे भाऊ मिळून खाऊ, ही भाजप शिवसेना सरकारची कार्यपध्दती आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

या वेळी विरोधी पक्ष नेते विखे पाटील म्हणाले की राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना हे सरकार फक्त १८० तालुके दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषित केले .त्यामुळे हे सरकार झोपलेले आहे. त्यांना उठविण्यासाठी आम्ही ही संर्घष यात्रा काढली असुन विजय मल्या व निरव मोदी हजारो कोटी पैसे घेऊन पळाले त्यांना निकष नसुन शेतक-यांना नुकसानीचे अनुदान देयाला हे सरकार निकष लावत आहे. आनेक तालुक्यातील अधिका-यांनी चुकीच्या पध्दतीने आनेवारी काढल्याने अनेक तालुके दुष्काळ ग्रस्त होऊ शकले नाहीत. शिवसेना सरकारमध्ये बसून मलिदा खाण्याचे काम करत आहे . शिवसेनेचे नेते शेतक-या बद्दल पुळका दाखवतात पण ते काहीच करत नाहीत. शिवसेनेला शेतक-यांचा पुळका असेल त्यांनी या सरकारमधून बाहेर पडावे असा टोला त्यांनी लगावला. शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे या सरकारने हेक्टरी ५ ० हजाराचे अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी प्रस्ताविक करताना आ.चव्हाण म्हणाले की सत्तेवर येण्यापूर्वी हे भाजपाचे पुढारी बेरोजगारांना नोक-या देण्यात येतील असे आश्र्वासन दिले होते . पण साडे चार वर्ष झाले तरी या बेरोजगारांना नोक-या देऊ शकले नाहीत. रोज वाढत असलेली महागाई मुळे तर जनता होरपळून निघत आहे. तरी हे सरकार काहीच करत नाही. त्यामुळे या राज्याला व देशाला पुन्हा काँग्रेसच्या सत्तेची गरज असल्याचे सांगितले.

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, कै.शंकरराव चव्हाण हे राजकारणातील एक दिपस्तंभ होते. त्यांच्या रूपाने नांदेड जिल्ह्यासोबतच राज्याला व देशाला कुशल नेतृत्व मिळाले. सध्याचे सरकार खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. बॅंका बुडीत निघाल्या आहेत. भांडवलदार पैसे बुडवून परदेशात पळून गेले आहेत. विकासदर घसरला आहे. शेतकरी, कारखानदार अडचणी त सापडला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुन्हा काँग्रेसचे सरकार आणावे लागेल असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले,’ हे सरकार आंधळं व बहिरं आहे. लोकांचा आक्रोश यांना ऐकू येत नाही. यांच्या भावना बोथट झाल्या आहेत. महिला, बेरोजगार, शेतमजूर, शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी व हे संवेदनाहिन सरकार उलथून टाकण्यासाठी संघर्ष करणार आहे. त्यासाठी आपली साथ हवी आहे.

माजी मंत्री आ. नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर जोरदार टीका केली.