
नागपूर : वानाडोंगरी परिसरातील काळेवाडी येथील सूतगिरणी भागात गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एक व्यावसायिक दुकान पूर्णतः जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीने तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास नगरसेवक बालू मोरे यांनी अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वानाडोंगरी नगर परिषदेसह विविध अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुकानात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य साठवून ठेवण्यात आल्याने आग वेगाने पसरली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आग विझवण्यासाठी वानाडोंगरी नगर परिषद, एमआयडीसी अग्निशमन केंद्र, निलडोह नगर पंचायत, डिगडोह नगर परिषद आणि हिंगणा नगर पंचायत यांच्या एकूण पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. फायर ऑफिसर संकेत प्रमोद माटे यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य राबवण्यात आले.
प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानातील संपूर्ण साहित्य जळून नष्ट झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासन पुढील तपास करत आहेत.







