नागपूर : कळमना रोडवरील वांजरा परिसरातील अगरबत्ती कारखान्याला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सध्या या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत कारखान्यात ठेवलेला सर्व माल जळून खाक झाला.
माहितीनुसार, कळमना रोडवर असलेल्या वांजरा ले-आऊटमधील प्लॉट नं. ०५, ओम साई नगर येथील बहुमजली इमारतीत मे. मुजील डायमंड अगरबत्ती कारखाना आहे. मुजील अन्सारी हे या कारखान्याचे मालक असून शनिवारी सकाळी ८.४५ वाजता कारखान्याला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मात्र, आत्तापर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत कारखान्यात ठेवलेला सर्व माल जळून खाक झाल्याची माहिती आहे. जवळपास एकूण ५० हजारांचा माल जळून खाक झाल्याची सांगण्यात येत आहे.
आगीचे कारण सध्या समजू शकलेले नाही. ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. सध्या या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कळमना पोलिसांनी घटनेचा विस्तारित तपास सुरु केला आहे.