नागपूर:जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
आज 16 फेब्रुवारीला (रविवार) या बरुद कंपनीत स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर बसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील जंगलातसुद्धा या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी आजुबाजूच्या गावातून लोकांनी गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख देखील काही वेळातच घटनास्थळासाठी पोहोचले. या कंपनीत फटाक्यात लागणारी बारूद या ठिकाणी तयार होत असल्याची माहिती आहे.