नागपूर (भीलगाव) : नागपूर जिल्ह्यातील भिलगाव खैरी येथील ‘अंकित पल्प्स अॅन्ड बोर्ड्स’ मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज उत्पादक कंपनीत मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कामठीतील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या डी अॅक्शन सेक्शनमध्ये रिअॅक्टरमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यामध्ये रिअॅक्टरमधील उकळतं पाणी कामगारांच्या अंगावर पडल्याने गंभीर भाजल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली आहे.
‘अंकित पल्प्स अॅन्ड बोर्ड्स’ ही कंपनी औषधनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या एक्सीपिएंट्स आणि खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचं उत्पादन व वितरण करणारी थोक विक्रेता कंपनी आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, कामगारांनी तात्काळ इतरांना मदतीसाठी बोलावलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, स्फोटाचं नेमकं कारण शोधण्याचे काम सुरू आहे.या घटनेचा पुढील तपास कामठी पोलीस करत आहेत.