नागपूर: आयुर्वेदाला देश-विदेशात मान्यता मिळत आहे. पर्यायाने औषधी वनस्पतीलाही मोठी मागणी असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीचीही मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक यांनी व्यक्त केले.
ऍग्रोव्हिजन अंतर्गत सोमवारी औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ऍग्रोव्हिजनचे संयोजक डॉ. गिरीश गांधी, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, वनौषधी विषयाच्या तज्ज्ञ डॉ. वृंदा काटे, राजेंद्र काळे, अशोक जुनवाला, डॉ. रामदास आंबटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रीपाद काळे म्हणाले, ऍग्रोव्हिजन हे शेतकऱ्यांना संपन्नतेचा मार्ग दाखविणारे आयोजन आहे. पोशींद्यालाच आज वाईट दिवस आले आहे. अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असून शासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे. दुर्मिळ वनौषधींना सर्वत मान्यता मिळत आहे. संशोधनासाठी 10 राष्ट्रांसोबत सामंजस्य करार झाला आहे. 12 राष्ट्रांच्या विद्यापीठात आयुर्वेदाचे शिक्षण दिले जात आहे. 28 देशांमध्ये आयुष मंत्रालयाचे केंद्र स्थापित झाले आहे. 2014 मध्ये असलेली 5.12 मेट्रीक टन वनौषधींची मागणी आता 700 मेट्रीक टनावर पोहचली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये ही मागणी आणखी मागणी वाढणार असल्याने आतापासूनच नियोजन करण्यात आले आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांनीही या संधीचा लाभ घेऊन संपन्नतेची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले.
भारत वनौषधींचा सर्वातमोठा पुरवठादार – डॉ. काटे
वनौषधींचा न्युरासीटीकल, हर्बल आणि आयुर्वेद या तिन्ही क्षेत्रात उपयोग केला जातो. यामुळे वनौषधीची मागणी सातत्याने वाढत आहे. वनौषधींचा सर्वातमोठा पुरवठादार भारत असल्याने वनौषधीतून रोजगार मिळविण्याची मोठी संधी असल्याचे डॉ. वृंदा काटे यांनी सांगितले. आजही 80 टक्के वनौषधी जंगलातून येतात. वनौषधी काढण्यात येते पण नव्यने लावण्यात येत असल्याने अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. औषधी वनस्पतीचे उत्पादन घेणारे राजेंद्र काळे यांनी औषधी वनस्पतीतून मिळणाऱ्या लाभावर भाष्य केले.