
नागपूर: ‘भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज कि जय’ च्या जयजयकाराने गुरुवारी ईश्वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण निनादून गेले.
दासगणुविरचित संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज विजय ग्रंथाच्या २१ व्या अध्यायाचे सामूहिक पारायण खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रमात संपन्न झाले.
तत्पश्चात संत कवी कमलासुत रचित गजानन महाराज यांची मानस पूजा आणि श्रींची मंगल आरती असा शिस्तबद्ध अध्यामिक अनुभव आज गजानन महाराजांच्या भक्तांनी घेतला. या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने श्री गजानन भक्तांनी उपस्थिती लावली.
तत्पूर्वी, पारंपारिक दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी, योगाचार्य रामभाऊ खांडवे गुरुजी, भारतीय स्त्री शक्तीच्या अखिल भारतीय संगठन मंत्री डॉ. मनीषा कोठेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला समन्वयक अॅड. पद्मा चांदेकर, पंडित मोहन वैद्य, खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, डॉ. दीपक खिरवडकर, जयप्रकाश गुप्ता, राजेश बागडी, अविनाश घुशे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीरंग व-हाडपांडे, चेतना सातपुते, कल्पना मनापुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. चंद्रशेखर क्षेत्रपाल आणि त्यांच्या चमूचे स्वागत प्रा. सोले यांनी केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमाने धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा मेळ पाहायला मिळतो. या अंतर्गत संस्कारक्षम उपक्रम घेतले जातात आणि हे धार्मिक, सांस्कृतिक आणि सात्विक जागृतीचे माध्यम बनले असल्याचे गौरवोद्गार योगाचार्य रामभाऊ खांडवे यांनी काढले.
तत्पूर्वी, सकाळी 6 वाजता जैन कलार समाज भवन, रेशीमबाग येथून नामस्मरण दिंडी काढण्यात आली. या दिंडीत 400 गजानन भक्त सहभागी झाले होते. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय, गण गणात बाते, श्री गजानन जय गजाननच्या गजराने संपूर्ण परिस दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.











