Published On : Mon, Apr 6th, 2020

मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका !

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर : जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरूनच जावे. मास्क लावल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंबंधी एक व्हीडिओ संदेश आयुक्तांनी जारी केला आहे. यामध्ये मनपा आयुक्तांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना १०० टक्के लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. केवळ लॉकडाऊनचे पालन केल्यानेच आपण या संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो.

जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून प्रशासनाने या वस्तू घरपोच मिळण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी नागरिकांना या वस्तुंसाठी किंवा अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास त्यांनी मास्क लावूनच बाहेर निघावे.

वापरण्यात येणारा मास्क हा विकतच घेतला पाहिजे असे नाही. तर हा मास्क आपल्याला घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.