कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर रहिवासी एका विवाहित तरुणाने स्वतःच्या राहत्या खोलीत घरातील छताच्या लाकडी खांबाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7 वाजता घडली असून मृतक तरुणाचे नाव मो एजाज मो शमीम वय 26 वर्षे रा.कामगार नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुण हा मागील काही दिवसांपासून अंगात असलेल्या बुखार पासून कंटाळला होता परिणामी ह्या तरुणाचे काही प्रमाणात मानसिक संतुलन सुद्धा बिघाडले होते.आज सकाळी घरमंडळी घरात निवांत झोपी असल्याचे संधी साधून तरुणाने राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या करून जगाचा कायमचा निरोप घेतला.ही घटना घरमंडळींना निदर्शनास येताच सर्वाना एकच धक्का बसला व घरमंडळींनी दुःखाचा हंबरडा फोडला.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील शितगृहात हलविण्यात आले.यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक लहान मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे.
– संदीप कांबळे कामठी
