Published On : Thu, Apr 9th, 2020

फळे व भाजीपाला निर्जंतुकीकरणाबाबत बाजार समिती प्रशासनाने कार्यवाही करावी – सुनील केदार यांची सूचना

Advertisement

· कृषी उत्पन्न बाजार समितीची पाहणी

· विक्रेत्यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याच्या केल्या सूचना

नागपूर : शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळे उत्पादित केल्यानंतर ग्राहकांपर्यंत होणा-या विक्रीपर्यंत त्यांची अनेकांकडून हाताळणी केली जाते. तसेच रस्त्यावरील धुळीमुळेही भाजीपाला खराब होतो. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने फळे व कृषीमाल, भाजीपाला निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करावी, अशी सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली.

कळमन्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु मार्कट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज सकाळी त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत समिती सचिव राजेश भुसारी उपस्थित होते.

शहरासह राज्यात गेल्या 16 दिवसांपासून ‘लॉक डाऊन’ सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या विनाव्यत्यय मिळाव्यात, यासाठी त्यांनी सूचना केल्या. परिसराची पाहणी करताना श्री. केदार यांनी कृषीमाल उत्पादक शेतकरी, अडते आणि किरकोळ भाजीविक्रेत्यांना मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत सूचना केल्या.

महापालिका व बाजार समिती प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिल्या दिवसांपासून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी शहरातील मुख्य भाजीपाला मार्केट बंद केले आहे. नागरिकांना फळे व भाजीपाला सहज उपलब्ध व्हावा, यासाठी शहरातील विविध मैदानांवर सोशल डिस्टन्सिंग पाळून पर्यायी व्यवस्था केलेली आहे, असे बाजार समितीचे सचिव श्री. भुसारी यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी, अडते, किरकोळ विक्रेत्यांपासून ते ग्राहकांना मिळेपर्यंत अनेकांकडून शेतमालाची हाताळणी केली जाते. त्यामुळे कृषी उत्पादनाचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत विचार करावा. अडते व किरकोळ विक्रेत्यांना वेळोवळी हात स्वच्छ धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत आवश्यकता भासल्यास कार्यशाळा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मार्केट परिसरात भाजीपाला उत्पादक शेतकरी, अडते आणि भाजीविक्रेते यांच्यात योग्य समन्वय साधून शहरातील विविध भागात नागरिकांपर्यंत भाजीपाला सुरळीत पोहचत असल्याचे श्री. भुसारी यांनी मंत्री श्री. केदार यांना सांगितले. ‘लॉक डाऊन’च्या सुरुवातीला काही अडते व भाजीविक्रेत्यांनी कृषी उत्पादनाच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ‘लॉक डाऊन’च्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्यात येत असल्याच्या कारणावरुन परवाने रद्द केले जातील, असे प्रशासनाकडून सांगितले. त्यानंतर अडते व भाजीविक्रेत्यांनी व्यवहार सुरळीत ठेवल्याची माहिती श्री. भुसारी यांनी दिली.

तसेच ‘लॉक डाऊन’च्या काळात भेंडी, गवार, कोथिंबीर, कोबी, भोपळा, यासह आंबा, डाळींब, अननस, फणस, विविध फळे आणि कृषी माल तसेच कांदा, लसूण, आले आदी मसाल्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात येत असून, त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये, असे श्री. भुसारी यांनी सांगितले.