Published On : Fri, Mar 8th, 2019

३१ मार्चपर्यंत ‘टार्गेट’ पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा! : जाधव

मालमत्ता कर वसुली व मालमत्ता कर निर्धारकबाबत आढावा बैठक

नागपूर: शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत सर्व झोनला दिलेले ९० टक्के कर वसुलीचे ‘टार्गेट’ येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.

मालमत्ता कर वसुली व मालमत्ता कर निर्धारकबाबत गुरूवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या ॲड. मिनाक्षी तेलगोटे, मंगला लांजेवार, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरीश राउत, स्मिता काळे, सुवर्णा दखणे यांच्यासह सर्व झोनचे कर अधीक्षक, सहायक कर निर्धारक उपस्थित होते.

संपत्ती कर हे नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत असून यासाठी विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना वारंवार निर्देश देउनही निर्धारित वेळेत ‘टार्गेट’मधील कर वसुली करण्यात आली नाही. प्रत्येक झोनला थकीत करमुक्त करण्याबाबतही अंमलबजावणी करण्यासंदर्भात अनेकदा बैठक घेउन निर्देश देण्यात आले. यामध्ये आजघडीला दहाही झोनमधील काही वार्ड थकीत कर मुक्त होत आहेत ही चांगली बाब असून याबाबत कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी अधिका-यांचे अभिनंदन केले. मात्र निर्धारित वेळेत ठराविक कर वसुली न झाल्याबद्दल त्यांनी निराशाही व्यक्त केली.

येत्या ३१ मार्चपर्यंत प्रत्येक झोनकडून ९० टक्के कर वसुली करण्याचे ‘टार्गेट’ सर्व झोनला यावेळी देण्यात आले. ९० टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली करणा-या झोनमधील कर्मचा-यांवर सक्तीची कारवाई करण्यात येईल. शिवाय ‘टार्गेट’ पूर्ण न झाल्यास त्यास संबंधित वार्ड अधिका-यालाही जबाबदार ठरवून त्यांच्यावर सक्तीची कारवाई करण्याचा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी यावेळी दिला.

यावेळी कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दहाही झोनमधील मालमत्ता कर आकारणी, मालमत्ता कर मागणी देयके तामील करण्याबाबत आणि मे. सायबर सिटीम ॲण्ड सॉफ्टवेअर लि. व मे. अनंत टेक्नॉलॉजी लि. ने करावयाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

कर वसुली संदर्भात सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी मानसिकता बदलून जबाबदारीतून काम करावे, प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवून, नागरिकांशी संवाद साधून, नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना कर भरण्यासाठी तयार करावे, असे आवाहनही कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना केले.