Published On : Fri, Mar 8th, 2019

उष्माघात प्रतिबंधक कृती योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात झोनस्तरावर बैठक घ्या!

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : नियामक समितीची बैठक

नागपूर: उन्हाळ्यात उष्माघाताच्या बचावासाठी नागरिकांना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक झोनमध्ये उष्माघात प्रतिबंधक कृती योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व नगरसेवकांचा यामध्ये समावेश करून जनजागृतीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये नगरसेवकांसह आरोग्य विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित करून आवश्यक कार्यवाहीबाबत माहिती देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागपूर शहरातील जनतेकरीता उष्माघात प्रतिबंधक कृती योजना २०१९ तयार केली असून ही कृती योजना कार्यान्वित करण्याकरीता महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत नियामक समिती गठीत करण्यात आली. या समितीची गुरूवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत महापौर नंदा जिचकार यांच्यासह आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा रॉय, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, उष्माघात प्रतिबंध कृती योजनेच्या नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, समन्वयक डॉ. विवेकानंद मठपती, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी उपस्थित होते.

उष्माघात प्रतिबंधक कृती आराखडा हा समाजातील सर्व व्यक्तींचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना आहे. उष्माघात लागण व मृत्यू कमी करणे, मनुष्यबळाचे उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयी कौशल्य व ज्ञान विकसीत करणे व समाजात जनजागृती करणे हा या उष्माघात प्रतिबंधक कृती आराखड्याचा उद्देश आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. यावर्षीही या उपाययोजनांची सर्वत्र अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

उष्माघात प्रतिबंधक कृती आराखड्याच्या नवीन प्रस्तावित उपययोजनांमध्ये मनपाची सर्व दवाखाने, युपीएचसी, हॉस्पिटल परिसरात समाजातील लोकांसाठी ग्रीननेट व थंड पाण्याची व्यवस्था करणे, सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, बँक, शासकीय कार्यालय, शासकीय व खासगी दवाखाने, पेट्रोलपम्प, मॉल धारक व इतर सर्वांनी पाणी प्याउ लावण्याचे आवाहन करणे, उन्हाळ्यात दुपारी १२ ते ३ या वेळेत बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत आवाहन करणे, पाणी साठवा व जिरवा या योजनेवर सक्ती करणे, शासकीय कार्यालये, शाळा, दवाखाने, खासगी संस्थांमध्ये फिकट रंगाचा उपयोग करण्याचे आवाहन करणे, कामगारांना कामाच्या वेळेत बदल अथवा थंड छताखाली काम व थंड पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे, एसएमएसद्वारे उष्मालहरींबाबत लोकांना माहिती देणे व जागृती करणे आदी बाबी प्रस्तावित असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी देण्यात आली.

उष्माघात प्रतिबंधक कार्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या योग्य अंमलबजाबणीबाबत उष्माघात प्रतिबंधक विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मनपाच्या आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतूक करण्यात आले. याबद्दल महापौर नंदा जिचकार यांनी विभागाचे अभिनंदन केले. उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.