Published On : Fri, Sep 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘ईडा-पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत!’; नागपूरच्या १४५ वर्षांच्या अनोख्या परंपरेचा आज जागर

काळी-पिवळी मारबत आणि बडग्यांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय घडामोडींवर उपरोधिक भाष्य
Advertisement

‘ईडा-पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत!’; नागपूरच्या १४५ वर्षांच्या अनोख्या परंपरेचा आज जागरनागपूर : ‘ईडा-पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत…’ या घोषणांनी आज नागपूरच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. नागपूरची ओळख आणि सांस्कृतिक वैभव जपणारी मारबत आणि बडग्यांची मिरवणूक शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी पारंपरिक उत्साहात काढण्यात येणार आहे. तब्बल १४५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या अनोख्या उत्सवाकडे केवळ नागपूरकरांचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

तान्हा पोळ्याच्या निमित्ताने निघणाऱ्या या मिरवणुकीत काळी आणि पिवळी मारबत हे मुख्य आकर्षण असते. समाजातील अनिष्ट प्रथा, कुप्रथा, भ्रष्टाचार, अन्याय आणि रोगराई यांचा नाश व्हावा, यासाठी मारबतीसमोर साकडे घालण्याची परंपरा या उत्सवातून जपली जाते. ‘घेऊन जा गे मारबत’च्या जयघोषात नकारात्मक शक्ती आणि समाजातील वाईट प्रवृत्ती दूर जाव्यात, अशी भावना व्यक्त केली जाते.

१८८१ पासून काळी मारबतची परंपरा-

इतवारी धान्य बाजारातून निघणाऱ्या काळ्या मारबतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे १८८१ पासून काळी मारबत काढली जात असल्याचे सांगितले जाते. ब्रिटिश राजवटीतील जुलमी कारवायांचा निषेध करण्यासाठी या परंपरेला सुरुवात झाली. त्यामुळे मारबत उत्सवाचा संबंध नागपूरच्या सामाजिक आणि देशभक्तीच्या इतिहासाशीही जोडला गेला आहे.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काळी मारबत क्रोधित देवीच्या रूपात साकारली जाते. लाल रंगाची लांब जीभ, मोठे वटारलेले डोळे आणि रौद्र रूप हे तिचे वैशिष्ट्य आहे. या रूपातून समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश दिला जातो.

स्वातंत्र्याच्या भावनेतून पिवळी मारबत-

पिवळ्या मारबतीलाही मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरातील तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत समितीची स्थापना केली. परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून देशाची मुक्तता व्हावी आणि स्वातंत्र्य मिळावे, या देशभक्तीच्या भावनेतून ही परंपरा पुढे आली.

Advertisement

सुमारे २० फूट उंचीची पिवळी मारबत आकर्षक दागिन्यांनी सजवली जाते. तिचे भव्य रूप पाहण्यासाठी विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून नागरिक नागपुरात येतात.

बडग्यांतून घडामोडींवर मिश्कील भाष्य-

मारबतसोबत निघणारे बडगे हे या मिरवणुकीचे आणखी एक खास आकर्षण असतात. काळानुसार बडग्यांचे स्वरूपही बदलले आहे. आजच्या काळातील राजकीय घडामोडी, भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न, गुन्हेगारी, महागाई आणि विविध घटनांवर बडग्यांच्या माध्यमातून उपरोधिक भाष्य केले जाते.

विशेष म्हणजे, गंभीर सामाजिक आणि राजकीय विषय विनोदी आणि मिश्कील पद्धतीने मांडत जनजागृती करण्याची या परंपरेची खासियत आहे. त्यामुळे मारबत-बडग्यांची मिरवणूक ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक मिरवणूक न राहता समाजमनाचे प्रतिबिंब ठरली आहे.

देश-विदेशातील जाणकारांचेही आकर्षण

नागपूरच्या या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेचा अभ्यास आणि अनुभव घेण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक, सांस्कृतिक जाणकार आणि पर्यटक नागपुरात येतात. १४५ वर्षांपासून अखंडपणे जपली गेलेली ही परंपरा नागपूरच्या सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देणारी आहे.

काळ बदलला, समाज बदलला आणि बडग्यांमधून मांडले जाणारे विषयही बदलले; मात्र ‘ईडा-पिडा घेऊन जा गे मारबत’ हा जयघोष आणि समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करण्याची भावना आजही कायम आहे. त्यामुळे नागपूरची मारबत-बडग्यांची मिरवणूक ही केवळ एक उत्सवाची परंपरा नसून इतिहास, सामाजिक प्रबोधन आणि लोकभावना यांचा अनोखा संगम म्हणून आजही आपले वेगळेपण टिकवून आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.