| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 30th, 2018

  मराठा आरक्षणासंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या

  औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी फेसबुकवर पोस्ट टाकून एका तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  प्रमोद होरे पाटील असं या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मुकुंदवाडी येथे राहतो. प्रमोद विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. त्याने दोनवेळेस ग्रामसेवक पदासाठी परीक्षाही दिली होती.

  रविवारी दुपारपासून प्रमोद गायब होता. सायंकाळी त्याच्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुकवर त्याची पोस्ट पाहिली. त्यात तो मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वे रुळाजवळ उभा असून फोटोवर ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असं कॅप्शन लिहिलं होतं. हे कॅप्शन आणि रेल्वेरुळावरील त्याचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता रात्री त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याची माहिती समोर आली .

  आत्महत्येपूर्वी प्रमोदने काही मित्रांना टॅग करत आणखी एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी मराठा आरक्षणासाठी करा…प्रमोद पाटील मराठा आरक्षणाचा चौथा बळी,’ असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे प्रमोदने आरक्षणसाठीच आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याच्या फेसबुकअकाऊंटवरील पोस्ट खरी आहे की फोटोशॉप केलेली आहे, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145