नागपूर : मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. आतापर्यंत राज्य सरकारने दोन जीआर काढले. पण एकाही जीआरने मराठा समाजाचा प्रश्न सुटलेला नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसींनी विरोध केला आहे.
या घडामोडी पाहता मराठा नेत्यांनी थेट मराठा नेत्यांनाच इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर एकवेळ रामदास आठवले यांना मदत करू, पण मराठा नेत्यांना पराभूत करू, असा इशाराच मराठा समाजाने दिला आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच लढा देत आहोत. आता हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे.
इतके करूनही जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाजातील नेत्यांना आम्ही कुठेही फिरू देणार नाही. त्यांना निवडून येऊ देणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला.