मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे मैदानात उतरले आहे.आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिले आहे.
सरकारला२४ डिसेंबरनंतर एकही दिवस मिळणार नाही. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा २४ डिसेंबरनंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे, अशी मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात काहीच अडचण नाही. सरकारवर माझा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजात रोष नाही.
फक्त दोन-चार जणांचा हा विषय आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत असल्यामुळे मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहे. सामान्य ओबीसींच्या लक्षात आले आहे की, मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण त्यांना दिले पाहिजे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दोन-चार जणांची धडपड सुरु आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान २४ डिसेंबरपर्यंत सरकार काय करते हे आम्ही बघत आहोत. आरक्षण बाबत निर्णय घेतला नाही तर पुढील दिशा ठरवणार आहोत. तशी वेळ येणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे. परंतु वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही मनोज जरांगे म्हणाले.