Published On : Sat, Apr 15th, 2017

मराठा समाजाचा 10 मेला आता अर्धनग्न मोर्चा


पुणे:
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 10 मे रोजी पुण्यात तरुणांचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रा. संभाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूट येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय येथे याचा समारोप होणार आहे. 2 ते 3 हजार तरुण यामध्ये सहभागी होतील. मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असून, मुख्यमंत्री मराठा समाजाच्या भावनांची कदर न करता समाजाला वेठीस धरत आहेत.

सरकारकडे वारंवार आरक्षणाची मागणी करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आगामी काळात तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी राज्यभर आरक्षण व महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी येत्या 2 ते 9 मे या काळात हिंगोली, वाशीम, यवतमाळ, परभणी, नांदेड या जिह्यात आरक्षण सभा व बैठका होणार आहेत. त्यानंतर 10 मे रोजी पुण्यात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.