Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 24th, 2018

  काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं

  औरंगाबाद: मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

  आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

  यावेळी शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे अंत्यसंस्कारासाठी आले होते. मात्र त्यांना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. मराठा मोर्चेकऱ्यांना खासदार चंद्रकांत खैरे यांना अक्षरश: हाकलून लावलं.

  अनेक जण त्यांच्यावर धावून गेले. कोणत्याही लोकप्रतिनिधीने इथे येऊ नये, असं म्हणत मराठा मोर्चा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना काढता पाय घ्यावा लागला.

  ‘काकासाहेबाच्या कुटुंबीयांना मदत द्या’

  मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.

  सरकारकडून मदत जाहीर
  दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.

  काकासाहेब शिंदे कोण होते?
  काकासाहेब दत्तात्रय शिंदे
  औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील कानट गावचे रहिवासी
  शिक्षण – दहावी
  औरंगाबादमधील मराठा मोर्चापूर्वी प्रत्येक मराठा मोर्चात सहभाग
  आई-वडील शेतकरी, एक एकर शेती. त्यावरच कुटुंबाची गुजराण
  लहान भाऊ अविनाश शिंदेचं अद्याप शिक्षण सुरु आहे.
  काकासाहेब शिंदे घरातील एकमेव कमावते होते.
  ते ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. काकासाहेब शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते होते.
  युवा सेना जिल्हाध्यक्ष संतोष माने यांच्या कारवर काकासाहेब शिंदे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते.
  काल दुपारी जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे सहभागी होते.
  सर्व आंदोलकांनी जलसमाधीसाठी धाव घेतली होती, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
  मात्र काकासाहेब शिंदे निसटून त्यांनी गोदावरी नदीत उडी मारली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145