Published On : Mon, Dec 5th, 2022

दोन स्थानकादरम्यान आता धावणार अनेक रेल्वे गाड्या

Advertisement

ऑटोमॅटीक सिग्नलिंगवर चालणारी चेन्नई एक्सप्रेस पहिली
-संपूर्ण नागपूर विभागात लवकरच ऑटोमॅटीग सिग्नलिंग
-रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी 398.97 किमी परिसर

नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते गोधनी दरम्यान 6.55 किमी पर्यंत ऑटोमॅटीक सिग्नलिंग करण्यात आली. येणार्‍या दिवसात संपूर्ण नागपूर विभागात तंत्रज्ञानावर आधारीत सिग्नलिंग होणार आहे. या प्रणालिवर चालणारी चेन्नई-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही पहिली गाडी ठरली.

नागपूर विभागात एकूण 414.76 किमी मार्ग ऑटोमॅटीग सिंग्नलिंग करायचा आहे. त्यापैकी ऑगस्ट 2022 मध्ये पहिल्यांदाच नागपूर – गोधनी दरम्यानचा मार्ग पूर्ण करण्यात आला. उर्वेरीत 398.79 किमी सिग्नलिंगसाठी रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच संपूर्ण नागपूर विभागात अ‍ॅटोमॅटीग सिग्नलिंग करण्यात येणार आहे.

कधी काळी रेल्वे गाड्यांना सिग्नलिंगचे काम कर्मचार्‍यांव्दारे केले जायचे. ही वेळखावू पध्दत होती. मन्युष्यबळही मोठ्या प्रमाणावर लागायचा. त्यातुलनेत गाड्यांची गती वाढत नव्हती. अलिकडे रेल्वे अत्याधुनिक झाली. तंत्रज्ञानाचा वापर ठिकठिकाणी व्हायला लागल्याने गाड्यांची गती वाढली आहे.

नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या हृदयस्थानी आहे. याठिकाणी डायमंड क्रासिंग आहे. म्हणजे देशभरातील सर्वच रेल्वे गाड्या नागपूर मार्गे निघतात. त्यामुळे नागपूर अतिशय व्यस्त स्टेशनपैकी एक आहे. त्यातही नागपूर – गोधनी हा अतिशय व्यस्त मार्ग आहे. हावडा ईटारसी कडून आलेल्या गाड्या स्टेशनच्या बाहेर म्हणजे आउटरवर थांबायच्या.

तासनतास गाड्या थांबविल्याने प्रवाशांनाही कंटाळा यायचा. रेल्वे बोर्डाच्या आदेशाने नागपूर – गोधनी दरम्यान अ‍ॅटोमॅटीग सिग्नलिंगचे काम अलिकडेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे गाड्यांना आउटरवर थांबण्याची गरज नाही. आधी दोन रेल्वे स्थानकादरम्यान एकच गाडी धावायची. आता दोन रेल्वे स्थानकादरम्यान एकापेक्षा अनेक गाड्या धावतात. रेल्वेची गती वाढली असून प्रवाशांचा वेळ वाचला आहे. विशेष म्हणजे सिग्नलिंगची संपूर्ण हालचाल स्टेशन आणि रेल्वे कंट्रोलमध्ये लाईव्ह पाहता येते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. सिग्नलिंगमुळे नागपूर आणि गोधनी मार्गावरील गाड्यांची गर्दी कमी झाली आहे.