Published On : Fri, Aug 16th, 2019

मुंबई आणि उपनगरातील प्रमुख दहिहंड्या रद्द, सर्व निधी पूरग्रस्तांना

Advertisement

कोल्हापूर, सांगलीसह कोकणातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मंडळांनी दहिहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. घाटकोपर येथे राम कदम यांच्या पुढाकाराने होणाऱ्या दहिहंडी पाठोपाठ वरळी येथे सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानची तसेच दहिसर येथे प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने होणारी दहिहंडी रद्द करण्यात आली आहे. त्याशिवाय गिरगाव, दादर, कुर्ला अशा अनेक भागातील राजकीय हंड्या यंदा न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. ही सर्व रक्कम पूरग्रस्तांच्या मदतनिधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईमध्ये दरवर्षी साधारणपणे तीन हजारांच्या आसपास लहान मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. त्यातील प्रमुख हंड्यांचा खर्च हा काही कोटींच्या घरात असतो. यातील बहुतांश मोठ्या मंडळांच्या हंड्या यंदा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव रद्द करून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतकार्याला देण्यात येणार असल्याचे आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन जाहीर केले. गेल्या काही वर्षात पश्चिम उपनगरातील सर्वांत मोठे आकर्षण ठरणारी आमदार प्रकाश सुर्वे यांची दहिहंडीही यंदा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वरळी येथील जांभोरी मैदानावरील संकल्प प्रतिष्ठानचा दहिहंडी उत्सव ही मुंबईची एक ओळख बनली आहे. यंदा तेथेही उत्सवाचा झगमगाट नसेल. ‘माझ्यासह सर्व कार्यकर्ते सध्या पूरग्रस्तांच्या मदतकार्यात व्यस्त आहोत. त्यामुळे यंदा दहीहंडीपेक्षा कोलमडलेले संसार पुन्हा उभे करणे हे आमचे प्राधान्य असेल,’ असे सचिन अहिर यांनी सांगितले.

Gold Rate
09 july 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver/Kg 1,08,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या काही वर्षांत शिवसेना आणि भाजपमध्ये दहीहंडी आयोजनासाठी स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळत होते. पण यंदा दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी उत्सव रद्द केल्यामुळे आता छोट्या दहीहंड्यांचे आयोजन करणारे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.

ठाण्यात खर्चाला कात्री

मुंबईतील काही आयोजकांनी यंदा दहिहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला असला तरी ठाण्यात मात्र हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. ठाण्यातील टेंभी नाका, वर्तनकनगर येथील संस्कृती प्रतिष्ठान, रघुनाथ नगर येथील संकल्प प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोज येथील समर्थ प्रतिष्ठान आणि मनसेच्या नौपाड्यातील दहिहंडी उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात उत्सव साजरा होणार नसून परंपरा जपणे आणि गेले अनेक दिवस सराव करणाऱ्या गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवाची परंपरा खंडीत करणार नसल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे. हंडीच्या बक्षिसांची रक्कम आणि कलाकारांच्या मानधनावर होणाऱ्या खर्चाला कात्री लावत तो निधी पूरग्रस्तांकडे वळविणार असल्याचेही काही आयोजकांनी सांगितले. त्याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत केली जाणार आहे.

Advertisement
Advertisement