Published On : Mon, Aug 20th, 2018

फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली राज्यातील अनेकांची फसवणूक

Advertisement

नागपूर : फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली हायप्रोफाईल महिलांसोबत मैत्री करून देण्याचे तसेच एका भेटीत हजारो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यातील हजारो लोकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सक्करदरा पोलिसांनी यश मिळवले. या टोळीचा म्होरक्या रितेश ऊर्फ भेरूलाल भगवानलाल चामार (बैरवा) तसेच त्याच्या टोळीतील सुवर्णा मिनेश निकम (वय ३३, रा. नेरळ, नवी मुंबई), पल्लवी विनायक पाटील (वय २१, रा. खकली वाडा, जि. ठाणे), शिल्पा समीर सरवटे (वय ५२, रा. डोंबिवली, मुंबई) तसेच निशा सचिन साठे (वय २४, रा. गुंजन चौक, येरवडा पुणे) या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून ११ मोबाईल, लॅपटॉप, सीपीयू, २५ सीमकार्ड, २७ एटीएम कार्ड आणि ३२,६०० रुपये असा एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

टोळीचा म्होरक्या रितेश मूळचा राजस्थानमधील गोपालसागर जासमा, जि. चितौडगड येथील रहिवासी आहे. तो केवळ आठवी पास आहे. रोजगाराच्या निमित्ताने तो आठ वर्षांपूर्वी मुंबईत आला. वरळी भागात तो हाच गोरखधंदा करणाऱ्याच्या संपर्कात आला. बक्कळ कमाई होत असल्याचे पाहून त्याने सात वर्षांपूर्वी स्वत:च हा गोरखधंदा सुरू केला. त्याने ठाण्यातील कापरबावडी परिसरातील एका मॉलमध्ये एक आॅफिस भाड्याने घेतले. प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून घेत त्यावर तो जाहिराती देत होता.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महानगरातील नागरिकांना फसविण्याची शक्कल लढवून त्याने निशा फ्र्रेण्डशिप क्लबची जाहिरात देणे सुरू केले. हायप्रोफाईल महिला, डॉक्टर, इंजिनिअर तसेच तरुणींसोबत मैत्री करा. त्यांच्यासोबत मोठी हॉटेल्स, मसाज पार्लर, स्पामध्ये गुप्त भेट घडवून आणण्याची तसेच त्यांच्याशी ‘मैत्रीसंबंध’ जोडून देण्याची बतावणी ही टोळी करीत होती. ‘संबंध’जोडा अन् रोज दोन तासात २० हजार रुपये कमवून देण्याचीही थाप टोळीतील सदस्य मारत होते.
त्यामुळे या टोळीच्या भूलथापांना रोज विविध शहरातील अनेक तरुण, पुरुष बळी पडत होते. जाहिरातीत नमूद मोबाईलवर फोन करताच या टोळीतील सदस्य सावजाचा खिसा कापण्यासाठी कामी लागत होते.

सक्करदऱ्यातील एका विवाहित पुरुषाने जाहिरात वाचून नमूद मोबाईल नंबरवर दोन महिन्यांपूर्वी संपर्क साधला. पलीकडून मधाळ स्वरात बोलणाऱ्या महिलेने त्याला प्रारंभी एक हजार रुपये फ्रेण्डशिप क्लबच्या खात्यात जमा करून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्याच शहरात विविध वयोगटातील हायप्रोफाईल महिला-मुली उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांच्यासोबत तुम्ही मैत्री करा आणि नंतर महिलांच्या मर्जीप्रमाणे तुम्ही त्यांच्यासोबत मोठी हॉटेल्स, फार्म हाऊस, बंगलोज, स्पा, मसाज पार्लरमध्ये जाऊन रोज अवघ्या दोन तासात २० हजार रुपये कमवू शकता, असेही तिने सांगितले.

‘तिच्या’मुळे झाला भंडाफोड
तिच्या भूलथापांना बळी पडून संबंधित व्यक्तीने आधी एक हजार रुपये तिने सांगितलेल्या खात्यात जमा केले. नंतर हॉटेलची फी, त्यानंतर वेगवेगळी कारणं सांगून त्याला टोळीतील आरोपी महिलांनी एकूण १ लाख, २६ हजार रुपये अ‍ॅक्सिस बँकेच्या पुण्यातील खात्यात जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतरही वेगवेगळे कारण सांगून त्याला रक्कम जमा करायला ही टोळी सांगत होती. घरची स्थिती जेमतेम, त्यात बेरोजगार असलेल्या या व्यक्तीने महिला मैत्रिणींसोबतच हजारो रुपये मिळणार, या आशेने आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवून टोळीच्या खात्यात रक्कम जमा केली होती. मात्र, त्याची ना कुणा महिलेसोबत मैत्री झाली ना कुणी त्याला रक्कम दिली. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला. आत्महत्येचा विचार करीत असलेल्या या व्यक्तीची मानसिक अवस्था ध्यानात घेत त्याला त्याच्या पत्नीने मानसिक बळ दिले. त्यानंतर त्याला सक्करदरा पोलीस ठाण्यात आणले.

त्याची कैफियत ऐकून ठाणेदार सांदिपान पवार यांनी गुन्हा दाखल केला. तसेच पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांंना माहिती दिली. उपायुक्त भरणे यांनी त्याची गंभीर दखल घेऊन या टोळीचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू केले. ज्या बँक खात्यातून रक्कम काढली जात होती. ती महिला खातेधारक निशा साठे हिच्यावर नजर रोखली गेली. मात्र, खाते तिचे असले तरी एटीएम कार्डच्या माध्यमातून दुसराच आरोपी रक्कम काढत असल्याचे लक्षात आल्याने सक्करदरा पोलिसांचे पथक ठाण्याला पाठविण्यात आले. या पथकाने रितेश ऊर्फ भेरूलालच्या मुसक्या बांधल्या.

त्याच्या लेग सिटी मॉल शॉपमधील कार्यालयाची आणि घराची झडती घेतली असता पोलिसांना उपरोक्त मुद्देमाल मिळाला. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सुवर्णा, पल्लवी, शिल्पा आणि निशा या चौघींना अटक करण्यात आली. या टोळीला नागपुरात आणल्यानंतर कोर्टातून त्यांचा २३ आॅगस्टपर्यंत पीसीआर मिळवला.

नागपूर, पुणे सॉफ्ट टार्गेट
प्राथमिक चौकशीत या टोळीने मुंबई, ठाणे, पुणे औरंगाबाद आणि नागपूरसह विविध शहरातील हजारो व्यक्तींची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. मात्र, राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नागपूर आणि पुणे सॉफ्ट टार्गेट असल्याचे त्यांनी सांगितले. या टोळीने विविध बँकांमध्ये २८ खाते उघडले असल्याचे आणि ते वेगवेगळ्या (सात खाते निशा साठेच्या नावावर) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२० टक्के कमिशन
आरोपी रितेशकडे काम करणाऱ्या मुली २० टक्के कमिशनवर कॉल सेंटरवर काम करावे, तसे करीत होत्या. ग्राहकाकडून जेवढी रक्कम मिळाली त्यातील २० टक्के रक्कम संबंधित मुलगी-महिलेला फोनवर मधाळ स्वरात बोलण्यासाठी दिली जात होती. त्या त्यांच्या घरूनच फोनवर ग्राहकांशी बोलत होत्या. जेथील ग्राहक आहे, तेथेच आपण राहतो, असे सांगून त्या संबंधित व्यक्तीला मूर्ख बनवित होत्या.

Advertisement
Advertisement