नागपूर : महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील तीन वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहे.
वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरीविरुद्ध सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत असतात; तरीदेखील काही वीजग्राहक नवनवीन क्लृप्त्या वापरून विजेची चोरी करीत असतात. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येत असून माहिती देणाऱ्याचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येत असते.
२०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात अशा स्रोतांद्वारे वीजचोरीच्या ३६ ठिकाणांची माहिती मिळाली. या ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे ४ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून ही संपूर्ण रक्कम वीजचोर ग्राहकांकडून वसूल करण्यात आली आहे. योजनेनुसार या वीजचोरीची १० टक्के रक्कम माहिती देणाऱ्याला रोख स्वरूपात बक्षीस रूपाने देण्यात आली आहे.
यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ज्या भागात जास्त वीजचोऱ्या आहेत, त्या भागात भरारी पथकाने सातत्याने भेटी द्याव्यात आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने वीजचोरांविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देश दिले. महावितरणने वीजचोरी पकडण्यासाठी सर्व मंडळस्तरांवर भरारी पथकांची स्थापना केली आहे. या भरारी पथकाद्वारे वीजचोरीविरुद्ध सातत्याने मोहिमा राबविण्यात येत असतात.









