Published On : Tue, Jan 9th, 2018

मनोरा आमदार निवास १ फेब्रुवारीपासून रिकामे करणार : उच्चाधिकार समितीचा निर्णय

मुंबई : मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्याचा निर्णय आज झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक समिती प्रमुख व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, मुख्य सचिव सुमित मल्लिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशनच्या (एनबीसीसी) मार्फत करण्यात येणार आहे. पुनर्बांधणीसाठी पर्यावरणविषयक व इतर विविध परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एनबीसीसीला सहकार्य करावे व लवकरात लवकर परवाने मिळवून द्यावेत, असे निर्देश यावेळी समितीच्या वतीने देण्यात आले. तसेच बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आमदार निवासातील कक्ष रिकामे करावेत व तेथील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम कमी कालावधीत व्हावे, यासाठी वेगाने प्रक्रिया कराव्यात. तसेच या बांधकामासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.