Published On : Fri, Aug 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशांवर प्रश्नचिन्ह.दरेकरांनी आधी कागदपत्रे पाहावीत; मनोज जरांगे यांची टीका

Advertisement

जालना – मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वडीगोद्री येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला.

जरांगे यांनी दावा केला की, मराठा समाजाच्या कुणबी जात प्रमाणपत्रांबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या कथित लेखी आदेशांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “कोणतेही विधान करण्यापूर्वी दरेकरांनी बावनकुळे यांच्या आदेशांची आणि संबंधित कागदपत्रांची पाहणी करावी. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतरच भूमिका मांडावी.”

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात करण्यात येणार आहे. या दौऱ्यात मराठा समाजाशी संवाद साधून आरक्षण, जात प्रमाणपत्रे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.

Advertisement

कुणबी जात प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेबाबतही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केले. पडताळणीची प्रक्रिया सर्वांसाठी समान असताना केवळ मराठा समाजाच्या प्रकरणांवर अधिक भर का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.