मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा समाजबांधव 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले होते. 29 ऑगस्टला ते मुंबईत दाखल झाले आणि त्याचवेळी भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी म्हटले की, मराठा समाजाचे हे आंदोलन शांततामय आणि ऐतिहासिक आहे, परंतु महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. “ओबीसी कोट्याद्वारे आरक्षण मिळावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे, मात्र या तिघेही मूग गिळून गप्प आहेत,” असे उपाध्ये म्हणाले.
भाजपची भूमिका स्पष्ट आहे.मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, ओबीसी आरक्षणावर परिणाम न होता. मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली, ही लोकशाहीतील त्यांची अधिकाराची बाब आहे, परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने आता स्पष्टता द्यावी, असेही उपाध्ये म्हणाले.
उपाध्ये पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी अनेक पावले उचलली आहेत:
महायुती सरकारच्या काळात मराठा समाजाला १०% आरक्षण मिळाले आणि सर्वोच्च न्यायालयाने अद्याप त्याला रद्द केलेले नाही.
शिंदे समितीस मुदतवाढ मिळाली, जे आंदोलनाच्या मागणीसाठी महत्त्वाचे होते.
आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना नोकरी मिळावी, ही मागणी जवळपास पूर्ण झाली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील १ लाख उद्योजकांना ८,३२० कोटींचे कर्ज वाटप केले.
राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून १७.५४ लाख विद्यार्थ्यांना ९,२६२ कोटी रुपये मिळाले.
उपाध्ये म्हणाले, मराठा समाजाला न्याय देणारे देवेंद्रजी आणि निष्क्रिय राहणारे काँग्रेस, उद्धव, शरद पवार यांचे राजकारण हाणून पाडले पाहिजे. महाराष्ट्रातील सामाजिक न्यायासाठी योग्य तो निर्णय घ्या.