Published On : Tue, Jul 10th, 2018

ड्रेनेज लाईनच्या देखभाल दुरूस्ती व नियंत्रणाचे काम बांधकाम विभागाकडे सोपविण्यात यावे : मनोज चापले

नागपूर : शहरातील सर्व ड्रेनेज लाईनच्या देखभाल दुरूस्ती व नियंत्रणाचे काम बांधकाम विभागाकडे सोपविण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. मंगळवारी (ता.१०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी समिती उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरावार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, सुनील धुरडे, हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे, कारखाना विभागाचे योगेश लुंगे, राजेश हाथीबेड प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील ड्रेनेज लाईन चोकेजच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्या दुरूस्त करण्यासाठी मनपाचे कर्मचारी सातत्याने व्यस्त असतात. ड्रेनेज लाईनच्या देखभाल दुरूस्तीचे व नियंत्रणाचे तांत्रिक कामे बांधकाम विभागामार्फत करण्यात यावी, बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत मनपाचे कर्मचारी व अधिकारी कामावर लक्ष देतील, असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले.

पावसाळ्यात आरोग्य विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा झोननिहाय आढावा सभापतींनी घेतला. नाले सफाईच्या कामाची गती ही समाधानकारक बघून सभापतींनी समाधान व्यक्त केले. नाले सफाईकरिता मनपाच्या मालकीच्या मशीन्स खरेदी करण्याच्या प्रस्तवाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मनपा सहा जेसीबी, दोन पोकलेन, तीन रोबोट मशीन्स, एक ट्रोजर, सात टिप्पर नव्याने घेत आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यात येणार आहे.

प्रारंभी मागील महिन्यात झालेल्या आढावा बैठकीच्या कार्यवृत्ताला मंजुरी देण्यात आली. संसर्गजन्य व किटकजन्य रोगावर केलेल्या उपाययोजनेचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.