
नागपूर– मानकापूर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात १९ वर्षीय बी.टेक. विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेली दुसरी विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली. गोधनी-झेंडा चौक मार्गावर ई-स्कूटर आणि डंपरची धडक झाल्यानंतर हा अपघात घडला.
मृत विद्यार्थिनीची ओळख जरीपटका येथील १९ वर्षीय मुस्कान देवाचंद खियालदासानी अशी झाली आहे. मुस्कान बोखारा येथील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तिच्यासोबत स्कूटरवर असलेल्या राजलक्ष्मी लोखंडे या अपघातात किरकोळ जखमी झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.४५ ते ६ वाजताच्या दरम्यान दोन्ही विद्यार्थिनी ई-स्कूटरवरून गोधनी-झेंडा चौक मार्गाने जात होत्या. यावेळी त्यांच्या स्कूटरची डंपरला धडक झाली. धडकेनंतर स्कूटरवर मागे बसलेली मुस्कान रस्त्यावर उजव्या बाजूला पडली आणि डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी डंपर अडवून चालकाला वाहनासह ताब्यात घेतले. दामोदर सिताराम सहारे (६१), रा. नारी-कपिलनगर, असे चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मानकापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.




