Published On : Mon, Jan 29th, 2018

मनिषनगर ते उज्‍वलनगर उड्डाणपूल व भूयारी मार्गाच्‍या उत्‍तम संचरचनेमूळे नागरिकांच्‍या घरावर गदा येणार नाही – नितीन गडकरी


नागपूर: मनिषनगर ते उज्‍वलनगर या दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील भागाला मनिषनगर रेल्‍वे क्रॉसिंगमूळे होणा-या वाहतूक कोंडी व अपघातांना आळा घालण्‍यासाठी केंद्र शासनाच्‍या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाअंतर्गत राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधण्‍यात येणा-या उड्डाणपूलासह अंडरपासची संरचना ही तांत्रिकदृष्ट्या सर्वात उत्‍तम असून, त्‍यामूळे नागरिकांची घरे पाडण्‍याची गरज भासणार नाही. या उड्डाणपूलावर सुमारे 550 कोटी खर्च केंद्र व राज्‍य शासनातर्फे खर्च करण्‍यात येतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे दिली. राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उड्डाणपूल व भूयारी मार्गाचे ई-भूमीपूजन तसेच महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नागपूर पेरी-अर्बन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व बेलतरोडी पोलिस स्‍टेशनच्या उद्घाटनाप्रसंगी स्थानिक बेसा भागातील श्यामनगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्‍हणून महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्‍ट्राचे पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री बबनराव लोणीकर प्रामुख्‍याने उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्‍या विविध योजनांच्‍या माध्‍यमातून नागपूरचा विकास होत असतांना नागरिकांनी कायदयाच्‍या चौकटीत राहूनच गृहनिर्माण व इतर बांधकामे करावीत. यामूळे विकासकार्यादरम्यान होणा-या भू-संपादन, पुनर्वसन या अडचणींना त्‍यांना सामोरे जावे लागणार नाही. मेट्रो रिजन प्रकल्‍पा-अंतर्गत अनधीकृत बांधकामे नियमित करत असतांनाच वाढलेल्‍या अतिक्रमणावर जिल्‍हा प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे, असेही गडकरी यावेळी म्‍हणाले.

बेसा-बेलतरोडी भागात बेलतरोडी पोलिस स्‍टेशन निर्माण झाल्‍याने आता पोलिसाचा प्रतिसाद कालावधी (रेस्‍पॉन्‍स टाइम) त्‍वरित नागरिकांना मिळेल. नागपूर पोलिस आयुक्‍तांनी विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून पोलिसांच्‍या गृह निर्माणसंदर्भात योजना आखल्‍या आहेत. यामध्‍ये 1500 पोलिस कर्मचा-यांना मालकीचे घर मिळण्‍यासाठीची योजनेचाही समावेश आहे. पोलिसांना सर्विस क्‍वार्टरची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासोबतच त्‍यांना मालकीचे घर मिळण्‍यासाठी राज्‍यशासनातर्फे कर्मचा-यांच्‍या मूळ वेतनाच्‍या 20 पट कर्ज व त्‍याचे व्‍याज सरकारतर्फे भरण्‍याची योजनाही आखण्‍यात आली आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्र्यांनी याप्रंसगी दिली. मनिषनगर रेल्‍वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधकामासाठी आपण 10 वर्षापासून संघर्ष करत होतो. या उड्डाणपूलाचे डिझाईन हे महाराष्‍ट्रात सर्वोत्‍कृष्‍ठ असून यामूळे घरांचे भू-संपादन,अतिक्रमण यांचा प्रश्‍न सुटला आहे. अतिशय व्‍यस्‍त अशा रेल्‍वे क्रॉसिंगमूळे नागरिकांची होणारी गैरसोयही टळणार आहे. भू-संपादन झालेल्‍या वर्धा रोडवरील चिंचभवन मधील 22 घरांना पर्यायी जागा राज्‍यशासनातर्फे दिली जाईल.


महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नागपूर पेरी-अर्बन योजनेचे भूमीपूजन दोन वर्षापूर्वी झाले व त्‍याचे उद्घाटनही आज आपल्‍या हस्‍ते होत आहे, या बाबीचा विशेष उल्लेख त्‍यांनी यावेळी केला. नागपूरातील महाराष्‍ट्र राष्‍ट्रीय विधी विद्यापीठाच्या 750 कोटीच्‍या आराखडयाला विद्यापीठाचे कुलगुरु, सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती बोबडे व उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती गवई यांच्‍या सोबत झालेल्‍या बैठकीत राज्‍यशासनातर्फे आज मंजूरी देण्‍यात आली असून यातील 200 कोटी रू. च्‍या प्रथम टप्‍प्‍याचे बांधकामही सुरू करण्‍याच्‍या निर्णयही घेण्‍यात आला आहे. यामुळे राष्‍ट्रीय विधी विदयापीठ स्‍वत:च्‍या परिसरातून ज्ञान संपादनाचे धडे गिरवुन देशात सर्वोत्‍कृष्‍ठ ठरेल, अशी आशा मुख्‍यमंत्र्यांनी व्‍यक्‍त केली. नवीन नागपूर विमानतळाचे बांधकामही दोन महिन्यात चालू होईल, असे त्यांनी जाहीर केले.

नागपूर-पेरी अर्बन पाणी-पुरवठा योजना
शहरातलगतच्‍या भागात शहरीकरण झपाटयाने होत असतांना स्‍थानिक सुविधांचा अभाव निर्माण होतो. यासाठी महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 232 कोटी रूपयांच्‍या निधीने शंकरपूर, बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोघली, हुडकेश्‍वर(खुर्द), खरबी, बहादुरा, गोन्ही सीम कापसी (खुर्द) या 10 गावांच्या पेरी अर्बन (शहरा लगतचा भाग) पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आज मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यापूर्वी ग्रामीण पेयजल योजनेच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रात 2,500 कोटीच्‍या निधीला प्रशासकीय मान्‍यता मिळाली आहे, अशी माहिती राज्‍याचे पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री बबन राव लोणीकर यांनी दिली.


नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील पांजरी, वडोदा, गवसी, मानापूर अशा इतर 9 गावांतील पाणी-पुरवठा नागपूर सुधार प्रन्‍यास मार्फत करण्‍यात येणार असून 232 कोटी पैकी 104 कोटी नागपूर सुधार प्रन्‍यासतर्फे मंजूर झाले आहेत. नागपूर पेरी अर्बन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 10 गावातील 2 लक्ष लोकांसाठी प्रतिदिन 70 लिटर प्रमाणे पाणी उपलब्‍ध होणार असून नागपूर सुधार प्रन्‍यासतर्फे महानगर पालिका क्षेत्रातील 9 गावांतील 3 लक्ष नागरिकांना पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्‍य सचिव संतोष कुमार यांनी याप्रसंगी दिली. मुख्‍यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व जलस्‍वराज्‍य प्रकल्प-3 अंतर्गत 20 पाणी-पुरवठा योजनेचे ई-भूमीपूजनही यावेळी करण्‍यात आले. या योजनेमुळे 10 तालुक्यातील 19 गावांना लाभ मिळेल, अशी माहिती नागपूर जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेच्‍या ‘स्‍वच्‍छता ही सेवा ‘या उपक्रमाअंतर्गत निबंध-स्‍पर्धा, स्‍वच्‍छ शाळा स्‍पर्धा यांमध्‍ये विजयी विदयार्थी व शाळेतील मुख्‍याध्‍यापक व शिक्षकांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. स्‍वच्‍छ शाळांमध्‍ये जि. प. सालई मोकासा, पारशिवणी ही शाळा प्रथम, तर जि.प. प्राथमिक शाळा, लिंगा, काटोल व्दितीय व हिंगणा डिंगडोह येथील जि.प. प्रा‍थमिक शाळा तृतीय क्रमांकावर होती. जि. प. शिक्षकांनी स्‍वच्‍छता संदर्भात घेतलेल्‍या 60 उपक्रमांचे संकलन असणा-या ‘ध्‍यासपर्व’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्‍यवरांच्‍या हसते करण्‍यात आले.


मनिषनगर ते उज्‍वलनगर उड्डाणपूल व भूयारी मार्ग
मनिषनगर ते उज्‍वलनगर उड्डाणपूल व भूयारी मार्गाच्या बांधकामासाठी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे निधी दिला जात असून याचे बांधकाम नागपूर मेट्रोतर्फे करण्‍यात येणार आहे. मेट्रो सोबतच उड्डाणपुल व भुयारी मार्गाचे बांधकाम या उड्डाणपूलाच्‍या संरचनेमुळे शक्‍य झाले आहे, अशी माहिती राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी चंद्रशेखर यांनी दिली.

बेलतरोडी पोलिस स्‍टेशनचे उद्घाटन
बेलतरोडी पोलिस स्‍टेशनमूळे 7 गावातील 85 ते 90 हजार रहीवाशांचा समावेश या पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत झाला आहे. 2 पोलिस निरिक्षक, 2 सह पोलिस निरिक्षक, 3 पोलिस उपनिरिक्षक व 50 पोलिस कर्मचारी असे मनुष्‍यबळ या स्‍टेशनला मिळणार असून हे स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन असेल, अशी माहिती झोन-4 चे पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्‍य यांनी दिली.

या तीनही ई-भूमीपूजन व उद्घाटन कार्यक्रमाला राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणतील अधिकारी, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, प्रभागातील नगरसेवक व नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.