
नाशिक : सुमारे ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्या अटकेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे. रक्तदाबात अचानक वाढ आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते थेट मुंबईला गेले. सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे तसेच त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
अटक टाळण्यासाठी कोकाटेंनी उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात सुनावणीला तात्काळ दिलासा न मिळाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असतानाही कोकाटेंना अटक होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. काही राजकीय वर्तुळात अटक टाळण्यासाठीच रुग्णालयात दाखल झाल्याची चर्चा होत आहे.
शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कारवाईसाठी तयारी केली आहे. यासाठी पोलिसांचे एक पथक आज मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदारकीवर संकट?
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले होते. आता मात्र, प्रकरण केवळ मंत्रिपदापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आमदारकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
तीन दशकांपूर्वीच्या प्रकरणामुळे कोकाटेंचे राजकीय अस्तित्व डळमळीत झाले असून, पुढील घडामोडींवर राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








