Published On : Sun, Dec 12th, 2021

मांग गारुडी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली ऍड. धर्मपाल मेश्राम यांची भेट

Advertisement

समाजाला न्याय मिळवून देण्याची केली मागणी

नागपूर : मांग गारुडी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने नुकतीच नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक तथा मांग गारुडी समाजाचे नेते नागेश मानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांची भेट घेतली.

शिष्टमंडळात हरिषभाऊ सकट, केशवभाऊ राखपसरे, दादू सकट, राजेश लोंढे, बाळासाहेब राखपसरे, दिपक लोंढे, नवनाथ राखपसरे, दादासाहेब कसबे, योगेश लोंढे, नवनाथ लोंढे, दत्ता खलसे आदींचा समावेश होता.

महाराष्ट्रातील मांग गारुडी समाजाची आधी भटक्या विमुक्त जमातीमध्ये नोंद व्हायची. उदरनिर्वाहासाठी हा समाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करायचा. त्यांच्या निवासाचे पुरावे, जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र तयार होत नाहीत. या समाजात अशिक्षिततेचे प्रमाण फार मोठे आहे. समाज नेहमी स्थलांतरित होत असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिला आहे. पोलिसांच्या लेखी समाजातील लोकांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्यामुळे जन्मापासूनच अनन्वित अत्याचार समाज सहन करीत आलेला आहे. समाजाच्या या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी काही शासकीय, प्रशासकीय यंत्रणा उभी करणे अत्यंत आवश्यक आहे.

मांग गारुडी समाजाचा सध्या समावेश हा अनुसूचित जातीमध्ये आहे. समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक अडचणी आहेत. जात वैधता प्रमाणपत्रासाठी ५० वर्षाचा जातीचा पुरावा आवश्यक आहे. मात्र मांग गारुडी समाजाला असा पुरावा देणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे पुराव्याची अट फक्त मांग गारुडी समाजासाठी ५ वर्षाची करण्यात यावी. याशिवाय सरसकट मागणीनुसार यांना रेशनकार्ड देण्यात यावेत, आदी मागण्या शिष्टमंडळानद्वारे भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे करण्यात आल्या.

यासंदर्भात महाराष्ट्राचे नेते व राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास या संपूर्ण विषय आणून देऊन त्यांच्या न्यायासाठी भारतीय जनता पक्ष भविष्यात लढा उभारेल, अशी ग्वाही यावेळी भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी शिष्टमंडळाला दिली.

चर्चेदरम्यान नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दीवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, नगरसेवक राजेश घोडपागे, पिंटू झलके, भगवान मेंढे, प्रमोद कौरेती, लखन येरावार, विजय चुटेले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.