Published On : Mon, Apr 6th, 2020

मनपातर्फे दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात सुमारे ३५ हजार बेघर, निराधारांची भोजन व्यवस्था

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण केले जात आहे. सोमवारी (ता.६) डिप्टी सिग्नल बाजार चौक परिसरातील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात मनपातर्फे शहरातील बेघर, निराधार व्यक्तींची भोजन व्यवस्था केली जात आहे.

मनपाच्या कार्यामध्ये ४४ स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य प्रदान केले आहे. या सेवाकार्यांतर्गत दिव्यांग बांधवांना तांदुळ, डाळ, खाद्य तेल, भाजीपाला यासह अन्य जीवनावश्यक वस्तुंचा समावेश असलेल्या किटचे वितरण करण्यात येत आहे. या किटच्या वितरणासाठी शैलेंद्र भोसले, रमेश उमाठे, विमल मारोटीया, अशोक बंब (जैन) या समाजसेवींनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी (ता.६) उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक अधीक्षक संजय दहीकर यांच्या उपस्थितीत या किटचे वितरण करण्यात आले.

लॉकडाउनच्या परिस्थितीत नागरिकांच्या सहकार्यासाठी आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मनपाची संपूर्ण टिम कार्यरत आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी त्यांची होणारी धडपड लक्षात घेता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या मदतीकरिता संबंधित अधिका-यांना निर्देशित केले. त्यानुसार शहरातील विविध भागातील दिव्यांगांना घरपोच जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्यात येत आहेत. या कार्यासाठी अनेक सेवाभावी नागरिकही सढळ हाताने मदत करीत आहेत.

दररोज सुमारे ३५ हजार नागरिकांची भोजन व्यवस्था
लॉकडाउनमध्ये अडकलेले बेघर, निराधार व ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा नागरिकांसाठीही मदतकार्य सुरू आहे. या सेवाकार्याद्वारे आतापर्यंत दररोज सुमारे ३५ हजार लाभार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जात आहे. यासाठी शहरातील ४४ स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मनपाद्वारे दहाही झोनमध्ये सकाळ व सायंकाळी भोजनाची व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक झोन क्षेत्रामध्ये दोन याप्रमाणे २० टिम तयार करण्यात आल्या आहेत. या टिम सकाळी व सायंकाळी नागरिकांना जेवण किंवा आवश्यक भोजन साहित्य पुरवितात. निराधार, बेघर व ज्यांच्याकडे जेवणाची सुविधा नाही अशा व्यक्तींकरीता मनपाद्वारे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ०७१२-२५६९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या संपर्क क्रमांकांवर अशा व्यक्तींची माहिती मिळताच त्या व्यक्तीबाबत संबंधित झोन क्षेत्राची जबाबदारी देण्यात आलेल्या टिमला त्या व्यक्तीची माहिती व त्याचा संपर्क क्रमांक कळविण्यात येते. त्यानुसार संबंधित टिम गरजू व्यक्तीपर्यंत जेवण किंवा साहित्य पोहोचविते.

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदारांना मैत्री परिवाराची साथ
याशिवाय ज्येष्ठ नागरिक, शहरात अडकलेले विद्यार्थी, नोकरदार आदींकडून संपर्क होताच त्यांना जेवणाचा डबा पोहोचविण्यात येत आहे. याकरिता मैत्री परिवार संस्था कार्य करीत आहे. घरी एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या जेवणाची अडचण होते. शिक्षणासाठी शहरात येणा-या विद्यार्थ्यांना मेसच्या जेवणावर अवलंबून राहावे लागते. मात्र लॉकडाउनमुळे सर्व मेस बंद आहेत. त्यामुळे शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अशीच अवस्था शहरात एकटे राहणा-या नोकरदारांचीही आहे. या सर्वांकरिता मैत्री परिवार संस्था पुढे आली आहे. स्वयंपाकाची व्यवस्था नसलेल्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, एकटे राहणा-या नोकरदारांना मैत्री परिवार संस्थेतर्फे दररोज सकाळी व सायंकाळी जेवणाचा डबा पुरविण्यात येत आहे. शहरात अडकलेल्या अशा गरजूंनी ९८९०४३२४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

बेघर, निराधार, रस्त्यावर जीवन व्यतित करणा-यांसाठी मनपातर्फे बेघर निवारा केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची माहिती मिळताच मनपाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.