अमरावती: राज्यभरात पेटलेल्या मराठा आंदोलनांचं लोन अमरावतीमध्ये पोहोचलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत असल्यानं संतप्त मराठा आंदोलक आज मंगळवारी बीएसएनएलच्या टॉवरवर चढला.
सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या ९ तारखेला अमरावती बंद पुकारण्यात आला असून बंद पूर्वी मराठा समाजाच्या बैठका सुरू असतानाच निलेश भेंडे (३०) हा तरुण आज सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या कार्यालय परिसरात पोहोचला. सरकार विरोधात घोषणा देत तो तेथील उंच टॉवर वर चढला. या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजचे कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
आंदोलक निलेश हा टॉवरवर उभा असल्यानं यंत्रणेवरील ताण वाढला. दरम्यान, निलेश भेंडे हा बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.