
घटना शनिवार (दि. २७ जुलै २०२५) रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला आपल्या परिचित महिलेच्या वैद्यकीय उपचारासाठी मेयो रुग्णालयात त्याच्या पतीसोबत गेल्या होत्या. त्या महिलेला सोनोग्राफीसाठी पाठवण्यात आले, त्यावेळी फिर्यादी महिला बाहेर येऊन फोनवर बोलत होत्या.
याचवेळी एका अनोळखी इसमाने फिर्यादी जवळ येऊन त्यांच्या अंगावर अश्लील व मनाला लज्जा आणणारा स्पर्श केला आणि तिथून पळून गेला. हा प्रकार पाहून महिलेला मोठा धक्का बसला. तिने तत्काळ आपले म्हणणे सोबतच्या महिलेशी व तिच्या पतीशी सांगितले.
त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्या व्यक्तीस तात्काळ शोधून पकडण्यात आले. आरोपीची ओळख पटवली असता त्याचे नाव चंद्रकुमार सुदामराव गायकवाड (वय २५, रा. वर्धा) असे असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी तहसिल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक शाहकार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर-
या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयांसारख्या ठिकाणी देखील महिलांवर अशा प्रकारचे प्रकार घडणे हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असली, तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.