मुंबई : देशातील एक अत्यंत संवेदनशील आणि गाजलेलं प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर जाहीर झाला. तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलं. यामध्ये भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे.
स्फोटाचा तपास, न्यायालयीन सुनावणी, साक्षी-पुरावे आणि राजकीय वादळांमधून गेलेल्या या खटल्याला आज अंतिम वळण लागलं. न्यायालयाने स्पष्ट केलं की, स्फोट घडल्याचं सिद्ध झालं असलं तरी संबंधित मोटारसायकलमध्येच बॉम्ब ठेवण्यात आला होता, हे ठोसपणे सिद्ध करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या. तसेच, बऱ्याचशा महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये त्रुटी आढळल्या, काही वैद्यकीय अहवालांत फेरफार झाल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आलं.
२००८ साली रमजानच्या काळात मालेगावमधील भिकू चौकात रात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. त्या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सात आरोपी गेली अनेक वर्षे न्यायालयीन लढाई लढत होते.
आजच्या निकालात न्यायालयाने श्रीकांत पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटकं सापडल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा नसल्याचं नमूद केलं. स्फोटात वापरलेल्या बाईकचा चेसिस नंबर स्पष्ट नव्हता आणि ती बाईक प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या ताब्यात होती हेही सिद्ध करता आलं नाही, असं न्यायालयाने नमूद केलं.
या निकालानंतर एकीकडे काहींनी न्यायप्रक्रियेवर विश्वास दर्शवला असला, तरी दुसरीकडे पीडितांच्या कुटुंबांमध्ये नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. १७ वर्षांची वाट पाहणाऱ्या या प्रकरणाचा असा शेवट अनेक प्रश्नचिन्ह उभा करत आहे.