Published On : Wed, Nov 14th, 2018

आधी बनवा आणि मग नावाची भांडणे करा – नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई : समृध्दी महामार्गातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृध्दी महामार्ग बनवा नंतर नावाची भांडणे करा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दयावे अशी मागणी शिवसेनेने तर भाजपने माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टिका केली आहे.

सुरुवातीला समृध्दी महामार्गाला विरोध करायचा आणि आता त्याच समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी भांडणे सुरु करायची ही दुटप्पी भूमिका शिवसेनेची सुरु आहे असे नवाब मलिक म्हणाले.

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचे भूसंपादन होत असताना त्यामध्ये जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने राहण्याची भूमिका शिवसेनेने सुरुवातीला घेतली होती.मात्र आता शिवसेनेची भूमिका बदलली असून शिवसेनेने शेतकऱ्यांच्या बाजूने न राहता समृध्दी महामार्गाच्या बाजूने कौल दिला आहे यावरुन भाजप-सेना युतीचा कारभार कसा सुरु आहे लक्षात येते असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.