| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 29th, 2017

  एलईडी लावताना नगरसेवकांना विश्वासात घ्या


  नागपूर:  शहरात सध्या पथदिवे एलईडीमध्ये मध्ये परावर्तीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे करीत असताना प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना विश्वात घ्या. ठेकेदारांकडून प्रत्येक कार्याचा आढावा घ्या आणि नगरसेवकांच्या तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देश विद्युत विशेष समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

  मनपाच्या विद्युत विशेष समितीची पहिली बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात पार पडली. बैठकीला सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांच्यासह उपसभापती प्रमोद चिखले, समितीचे सदस्य सर्वश्री लहुकुमार बेहते, राजकुमार साहू, श्रीमती वनिता दांडेकर, सय्यदा बेगम मो. निजामुद्दीन अंसारी, श्रीमती ममता सहारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल उपस्थित होते.

  यावेळी कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल यांनी शहरात युद्धपातळीवर सुरू असलेल्या एलईडी पथदिवे लावण्याच्या कार्याबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रकाश विभागाच्या कामासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या माहितीच्या सादरीकरणात समावेश होता. शहरातील १,३१,७४० पारंपरिक पथदिवे बदलवून ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांमध्ये ते परावर्तीत करण्यात येत आहेत. प्रथम टप्प्यात दोन हजार पथदिवे बदलविण्याचे कार्य हाती घेतले असून आतापर्यंत १५६९ पथदिवे बदलविण्यात आले आहेत. यानंतर दरमहा १० हजार पथदिवे लावण्यात येणार असून मे २०१८ पर्यंत सुमारे १,२६,००० पथदिवे बदलविण्याचे काम पूर्ण होईल. ३८.२ कि.मी. मेट्रो रेल मार्गावरील पथदिवे स्थानांतरीत करण्याच्या कामाचाही यात समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रिंग रोड सीमेंटीकरण प्रकल्पातील पथदिव्यांच्या नवीनीकरणाचे कार्यही यात समाविष्ट आहे. एलईडी पथदिवे लावल्यानंतर सुमारे ७१ टक्के ऊर्जा बचत होणार असल्याची माहितीही श्री. जैस्वाल यांनी यावेळी दिली. मनपाच्या सर्व कार्यालयीन इमारतींमध्येही एलईडी दिवे लावून ऊर्जा बचत करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मदतीने नागपूरला मॉडेल सोलर सिटी करण्याची योजना असून याअंतर्गत विविध ठिकाणांवर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र बसविण्याचे कार्यही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

  विद्युत समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांनी प्रत्येक प्रभागातील विद्युत तपासणीस कोण आहे त्याची यादी समितीला देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पथदिव्यांच्या देखरेखीकरिता नेमण्यात आलेल्या संस्था, कंत्राटदारांच्या कामगिरीबद्दल आढाव घेण्याच्या सूचनाही सभापती श्री. बालपांडे यांनी केल्या.

  बैठकीला सर्व झोनचे सहायक अभियंता (विद्युत) आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145