Published On : Wed, Aug 28th, 2019

शिक्षण व आरोग्य विभागातील नेमणूका, पदोन्नती व बदल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत करा!

विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण व आरोग्य (स्वच्छता, दवाखाने) विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांच्या नेमणूका, पदोन्नती व बदल्या करताना ते सरसकट न करता सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात यावे, असे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता.२७) विधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह समितीच्या सदस्या जयश्री वाडीभस्मे, सुमेधा देशपांडे, मनिषा धावडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, निगम अधीक्षक मदन सुभेदार आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये सामान्य प्रशासन विभागास दिलेल्या निर्देशाच्या अहवालावर, मनपातील सेवाभर्ती व पदोन्नती धोरणावर, सामान्य प्रशासन विभागातर्फे मागील तीन वर्षात दिलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदलीसंबंधीची माहिती, शिक्षण व आरोग्य विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांच्या बदलीबाबत, विधी विभागातील कायद्याचे सल्लागार व विधी सहायक यांच्या कामाची समिक्षा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या विषयनिहाय बदल्या करण्यात येतात तसेच आरोग्य (स्वच्छता, दवाखाने)विभागामध्ये लाड पागे समिती अंतर्गत कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात येतात. दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्यांच्या प्रस्तावासह त्यांच्या नेमणूका, पदोन्नतीचे प्रस्ताव आधी सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत पुढील कार्यवाही करणे. यासोबतच विधी विभागातील वकीलांच्या पॅनलमधील वकीलांचा तपशीलवार कार्यवृत्तांत विधी समिती सभापतींना सादर करण्यात यावा व मागील दोन आर्थिक वर्षामध्ये न्यायालयाकडून जे कॉस्ट लावण्यात आले आहेत त्याची केस निहाय माहिती समितीच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

स्टेशनरी संदर्भात तपासणी समिती गठीत
नागपूर महानगरपालिकेतील विविध विशेष समिती, पदाधिकारी व विविध विभागांना आवश्यक स्टेशनरी पुरविण्यात येते. मनपाच्या विविध विभागांकडून मागणी करण्यात आलेली स्टेशनरी व त्याचे वितरण याची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संगणकीकृत केली जात नाही. याशिवाय त्याची तपशीलवार माहितीही सादर करण्यात आली नाही. त्यामुळे स्टेशनरी संदर्भात आवश्यक चौकशी करण्यासाठी विधी समितीच्या उपसभापती मिनाक्षी तेलगोटे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली असून समितीमध्ये समिती सदस्या जयश्री वाडीभस्मे यांच्यासह विधी विभागाचे ॲड. सुरज पारोचे व स्टेशनरीचे कार्य सांभाळणारे सामान्य प्रशासन विभागातील संबंधित कर्मचारी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली व महिनाभरात या समितीने चौकशीचा इत्यंभूत अहवाल सादर करण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले. मनपाच्या विविध विभागामध्ये वापरात येणारे सॉफ्टवेअर हे सुध्दा प्रत्येक विभागामध्ये अधिकृतच वापरण्यात यावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांना उच्च शिक्षणासाठी परवानगी देण्याच्या पद्धतीची विचारणा करुन आतापर्यंत सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आलेल्या सर्व परवानगीची माहिती विधी समितीपुढे सादर करण्याचेही निर्देश समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले.