Published On : Thu, Jan 16th, 2020

मकरसंक्रांती : पतंग उडाली आकाशी, नागपुरात ‘ओ काट’

नागपूर : मकरसंक्रांत… हा सूर्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा क्षण, सूर्याचे दक्षिणायन सुरू होण्याचा पर्व, कडक गारवा देणाऱ्या हेमंत ऋतूला गुलाबी थंडीत परिवर्तित करणाऱ्या शिशिर ऋतूचे आगमन होण्याचा काळ. या दोन ऋतूंच्या समेटातून निर्माण झालेल्या ऋतुसंधीमुळे पर्णजडित वृक्षराजींचा निष्पर्ण होण्याच्या चक्राला सुरुवात, अशा सगळ्या घटनांची नांदी देणारा सण म्हणजे मकरंंक्रांत होय.

हा सण उत्साहात साजरा झाला. संक्रांतीला पतंग उडविण्याची ऐतिहासिक परंपरा. त्याच परंपरेतून ‘ढिल दे ढिल दे दे रे भैया, इस पतंग को ढिल दे, जैसे ही मस्ती में आये, उस पतंग को काट दे’ असा पतंग उडविण्याचा जल्लोष झाला. चक्री, मांजा अन् पतंग उडविण्याचा हा सोहळा तीळगूळ-चिवड्याने अधिकच द्विगुणित केला, सोबतीला डीजेची साथ होतीच. नाचत, गाणे गात उत्साहींनी पतंग उडविण्याचा आस्वाद घेतला. घरोघरी, रस्तोरस्ती अन् मैदानांमध्ये घोळक्या घोळक्याने मुले, तरुण, ज्येष्ठ असे सर्वच उंच भरारी घेण्याचा संदेश देणाऱ्या या सणोत्सवात ‘ओ काट’ची गर्जना करीत एकसाथ सामील झाले. हा असा सोहळा साजरा होत असतानाही नायलॉन मांजाची धाकधूक होतीच.

या मांजानेच कदाचित उत्साहाला मर्यादा होती. गलका नेहमीपेक्षा कमी होता आणि रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्याही कमीच होती. तरीही उड्डाणपूल सुरू उंच उडणाऱ्या पतंगांच्या मांजाने उड्डाणपुलांवरून धावणाऱ्या दुचाकीस्वारांना अडथळा निर्माण करीत होता. संभावित धोका टाळण्यासाठी शहरातील सर्व उड्डाणपुले रहदारीसाठी बंद करणे अपेक्षित होते. मात्र, सदर उड्डाणपूल वगळता शहरातील सर्वच पूल बिनधोक सुरू होते. त्याचा परिणाम अनेकांना पतंगांचा मांजा आडवा झाला. अनेकांचे गळे काहीशा अंशाने वाचले तर काहींना किरकोळ जखमाही झाल्याचे स्पष्ट झाले.

उत्साहींनी पतंग उडवाव्यात आणि प्रतिस्पर्धींसोबत झालेल्या आकाशीय झुंजीत कुण्या एकाचा पतंग कटावा. तो पतंग दूरवर भटकत भटकत कुठेतरी जाऊन अडकून जावा. झाडांवर अशा पतंग लटकलेल्या असल्याने अनेक ठिकाणी पतंगांचे झाड बहरले होते. झाडे उंच असल्याने या पतंग पुढचे काही दिवस तसेच बहरलेली असणार आहेत. पथदिव्यांना फास, रस्त्यांवर मांजाचे जाळे झाडांप्रमाणेच वीजवाहक तारा, पथदिवे यांनाही पतंग अडकलेल्या होत्या. वीजवाहक तारांना अडकलेली पतंग आणि त्यांचा लोंबणारे मांजा घातक ठरत होता. तर, रस्त्याच्या एका बाजूला असलेली पथदिवे व दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडांवर मांजांचे जाळे विणल्या गेले होते. यात अनेक पक्षीही अडकत असल्याचे दिसून येत होते.

रस्त्यांवर तरुणांची डेअरिंग
दोन पतंगांच्या झुंजीत कटलेल्या पतंगला पकडण्यासाठी तरुण मुले मोठ्या डेअरिंगने रस्त्यांवर स्पर्धा करीत असल्याचे दिसत होते. हे करताना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांचे भानही त्यांना नव्हते. काही ठिकाणी अचानक झालेल्या या प्रकारामुळे वाहनांना मुले धडकली तर कुठे वाहकांना प्रसंगावधान राखून गाड्या थांबवाव्या लागत असल्याचे चित्र होते. जीवाचा धोका पत्करून हे तरुण इतरांना संकटात टाकत असल्याचे दिसत होते.

बच्चे कंपनीही अग्रेसर, तरुणीही उत्साहित
मोठ्यांच्या स्पर्धेत लहानांचा टिकाव लागणार नाही, हे निश्चित असतानाही बच्चेकंपनी मोठ्या शिताफीने पतंग पकडण्यासाठी धावत होती. अखेर मोठ्यांचीच बाजी असे आणि उपकार म्हणून वाचलेला मांजा बच्चेकंपनीच्या हाती सोपवून सुसाट पळत होते. असे असतानाही चिमुकल्यांचा उत्साह काही केल्या कमी होत नव्हता, तर तरुणीही पतंगबाजीत कुठेही कमी नव्हत्या. गच्चीवर, भावासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

नायलॉन मांजा अन् भय महानगरपालिकेने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी, नायलॉन मांजाचाच प्रभाव सर्वत्र दिसून येत होता. हा मांजा तुटता तुटत नसल्याने, आडवा आलाच तर थेट चिरत जाण्याची क्षमता ठेवतो. या मांजामुळे दरवर्षी कुणाचा ना कुणाचा जीव गेल्याच्या घटना घडतच असतात. असे असतानाही हा मांजा सर्रास वापरला जात असल्याचे चित्र आहे. बंदी असतानाही हा मांजा येतो कुठून, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. कॉमेंट्रीने वाढवली रंगत क्रिकेटच्या मॅचची खरी रंगत कॉमेंट्रीमुळे वाढत असते. त्याच धर्तीवर काही ठिकाणी पतंगबाजीची कॉमेंट्रीही रंगली होती. गेल्या काही वर्षांत पतंगोत्सवाला कॉमेंट्रीचा मुलामा देण्याचे चलन वाढीस लागले आहे. त्याअनुषंगाने असे आयोजनही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.