नागपुर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस भरतीच्या उमेदवारांना राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, या निर्णयामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘मिशन खाकी’ अंतर्गत पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मोफत मैदाने उपलब्ध करून देण्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निर्णय घेण्याची विनंती केली होती. उमेदवारांना सरावासाठी मैदानांची उपलब्धता ही मोठी अडचण असल्याचे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना सरावासाठी मैदानांचा वापर करता येणार आहे. यासाठी पहाटे ५ ते सकाळी ९ किंवा सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत परवानगी देण्यात येणार आहे.
याशिवाय मैदानांवर स्वच्छता, सुरक्षितता, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सरावादरम्यान आवश्यक प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे आणि मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे सहकार्य घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना तयारीसाठी आवश्यक सुविधा मिळणार आहेत.




