Published On : Tue, Jun 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

चंद्रपूरच्या इतिहासाचा मोठा उलगडा; ‘बोर रिठ’मध्ये सापडले प्राचीन सभ्यतेचे ठसे!

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या इतिहासाला नवे वळण देणारा महत्त्वाचा दावा इतिहास अभ्यासक आणि संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळील पुरक्षेत्राबाहेर असलेल्या ‘बोर रिठ’ या ठिकाणी चंद्रपूरच्या सर्वात प्राचीन वस्तीचे पुरावे आढळल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, या परिसरात पाषाणयुगापासून सातवाहन, वाकाटक आणि यादवकालीन मानवी वस्ती अस्तित्वात होती.

प्रा. चोपणे यांनी केलेल्या अभ्यासात बोर रिठ परिसरातून सुमारे १० हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीन अवजारे, तीन हजार वर्षांपूर्वीच्या दगडी वस्तू, दोन हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी, प्राण्यांची हाडे व दात तसेच लोखंड वितळविणाऱ्या भट्ट्यांचे अवशेष आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय प्राचीन मंदिरांचे अवशेष, शिवलिंग आणि अन्य पुरातत्त्वीय खुणादेखील या भागात दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांच्या मते, आज ज्या परिसरात शेती केली जाते त्या ठिकाणी पूर्वी मोठी मानवी वस्ती होती. स्थानिक शेतकऱ्यांना यापूर्वी या भागातून प्राचीन नाणी आणि अलंकार सापडल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या परिसरात अधिकृत आणि शास्त्रीय पद्धतीने उत्खनन झाल्यास चंद्रपूरच्या इतिहासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण पुरावे उजेडात येऊ शकतात.

प्रा. चोपणे यांच्या संशोधनानुसार, चंद्रपूर परिसरातील इराई आणि झरपट नद्यांच्या काठावर पाषाणयुगापासून मानवी जीवन फुलले होते. दाताळा, नागाळा, देवाडा, आरवट तसेच पापामिया टेकडी परिसरातही प्राचीन मानवी वस्तीच्या खुणा आढळून आल्या आहेत. मात्र, बोर रिठ येथे पाषाणयुगीन, सातवाहनकालीन, वाकाटककालीन आणि यादवकालीन पुरावे एकाच ठिकाणी सापडल्याने हेच चंद्रपूर परिसरातील सर्वात जुने गाव असावे, असा त्यांचा दावा आहे.

Advertisement

या संशोधनामुळे चंद्रपूरच्या इतिहासाचा कालखंड केवळ गोंड राजवटीपुरता मर्यादित नसून त्यापूर्वीही येथे आदिवासी आणि हिंदू समाजाची वस्ती अस्तित्वात होती, असा निष्कर्ष पुढे येत आहे. गोंड, भोसले आणि ब्रिटिश कालखंडाचा इतिहास ज्ञात असला तरी चंद्रपूरच्या मूळ वस्तीचा शोध ‘बोर रिठ’ येथे लागल्याचे पुरावे समोर येत असल्याचा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे.

इतिहास संशोधकांच्या या दाव्यामुळे चंद्रपूरच्या प्राचीन वारशाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, पुरातत्त्व विभागाने या परिसरात सखोल सर्वेक्षण आणि उत्खनन करावे, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे. उत्खननातून मिळणारे निष्कर्ष चंद्रपूरच्या इतिहासाला नवे संदर्भ देऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बोर रिठ येथे विविध कालखंडांतील पुरावे एकाच ठिकाणी आढळून आले आहेत. त्यामुळे हेच चंद्रपूरचे मूळ गाव असावे. शास्त्रीय उत्खनन झाल्यास चंद्रपूरच्या प्राचीन इतिहासाचे अनेक नवे पैलू समोर येतील, अशी माहिती इतिहास अभ्यासक व संशोधक सुरेश चोपणे यांनी दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.