
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात न्यायालयाने आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. किल्ला न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी तपासासाठी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणात वापरण्यात आलेले शस्त्र, नष्ट करण्यात आलेले मोबाईल आणि गुन्ह्यामागील संभाव्य कटाचा तपास करण्यासाठी आरोपींची चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
आरोपींनी वकीलपत्रावर सही करण्यास केला नकार-
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, सुरुवातीला त्यांनी वकीलपत्रावर सही करण्यास नकार दिला. हा कागद कशासाठी आहे आणि त्यावर सही का करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वकिलांनी समजावून सांगितल्यानंतर आरोपींनी वकीलपत्रावर स्वाक्षरी केली. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर किल्ला न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोन मोबाईल आणि शस्त्राचा शोध सुरू-
गोळीबारानंतर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. हे मोबाईल शोधून काढणे, तसेच गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र कुठे लपवले किंवा फेकले, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, तपासासाठी अन्य राज्यांतही जावे लागणार आहे. आरोपींना शस्त्र कुठून मिळाले, त्यांच्याकडे आणखी शस्त्रे आहेत का आणि या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकीचा ऑडिओ-
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक अनिल पंडित याच्या नावाने धमकी आल्याचा दावा करण्यात आला आहे. गोळीबारानंतर एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या ऑडिओ क्लिपचा आणि गोळीबाराच्या घटनेचा परस्पर संबंध आहे का, यासह अन्य बाबींची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.
गोळीबार करून आरोपी फरार झाले होते. त्यानंतर त्यांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडच्या आधारे मुंबईत आणण्यात आले.
आरोपींच्या वकिलांचा पोलीस कोठडीला विरोध-
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी आपल्या पक्षकारांचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. आरोपी निर्दोष असून, कोणत्याही कटात सहभागी नसल्याचे सांगत त्यांना अधिक पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याची भूमिका बचाव पक्षाने मांडली.
आरोपींना यापूर्वीच ४८ तासांची पोलीस कोठडी मिळाली असून, त्यांची चौकशी करण्यात आली आहे. ट्रान्झिट रिमांडही मंजूर झाला असून, पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण जप्ती केल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. त्यामुळे आरोपींना पुढील पोलीस कोठडी देण्याऐवजी न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी करण्यात आली.
सीसीटीव्ही आणि दुचाकीच्या तपासातून अटक-
सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आणि दुचाकीचा माग काढण्यात आला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यांची भूमिका निश्चित करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाच्या तपासात अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवायांमधून मिळालेली माहिती एकत्र करून संपूर्ण कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुढील तपासाकडे लक्ष-
किल्ला न्यायालयाने आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. नष्ट केलेले मोबाईल, गोळीबारात वापरलेले शस्त्र, धमकीची ऑडिओ क्लिप आणि इतर संशयितांचा सहभाग या मुद्द्यांवर पोलिसांचा भर राहणार आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस या प्रकरणासंदर्भात सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत तपासातील कोणते नवे तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



