Published On : Sat, Aug 31st, 2019

धुळे एमआयडीसीत भीषण स्फोट; २० जणांचा मृत्यू, 40 गंभीर जखमी

Advertisement

धुळे: शिरपूर शहराजनजीक असणाऱ्या एमआयडीसीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जण या स्फोटात गंभीररित्या जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, शिरपूर एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची खेडीही स्फोटाच्या धक्क्याने हादरली. सूत्रांच्या माहितीनुसार, अजूनही ७० कामगार एमआयडीसीमध्ये अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

सध्या अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. याशिवाय, स्फोटाची तीव्रता पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकालाही (एनडीआरएफ) घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. सध्या या परिसरात धुराचे प्रचंड लोटही उठले आहेत. हा धूर घातक रसायनांचा असल्यास नागरिकांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे.

एमआयडीसीची परिसर शहरापासून दूर असल्यामुळे अनेक कामगार कंपनीच्या परिसरातच राहत होते. त्यांची कुटुंबेही याठिकाणी वास्तव्याला होती. त्यामुळे जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. हा स्फोट झाल्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली. त्यावेळी आणखी काही स्फोट होण्याची शक्यतेने मदतकार्य थांबविण्यातही आले होते. त्यामुळे जखमींवर उपचारासाठी विलंब झाला.

Advertisement

जखमींना सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकृती गंभीर असलेल्यांना खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचेही समजते.

दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि या केमिकल कंपनीचे मालक कोण आहेत, याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र, इतक्या घातक रसायनांच्या कारखान्यात सुरक्षेची पुरेशी काळजी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.