
नागपूर – शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत प्रतापनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध तंबाखू-सुगंधित पान मसाला साठवणाऱ्या आरोपीला अटक केली. पोलिस आयुक्त मा. रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली 17 नोव्हेंबरच्या रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिंधी कॉलनी, खामला येथील प्लॉट क्रमांक 185 वर अचानक छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान अनिल सदोरमल चावला (54) हा व्यक्ती घरातूनच अवैध तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा करताना पकडला. तपासात सरकारी बंदी असलेला सुगंधित तंबाखू, पान मसाला तसेच विविध ब्रँडचे फ्लेवर बॉक्स असा एकूण ₹1,71,938 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी पत्नी सौ. मुजु अनिल चावला हिच्या मदतीने आर्थिक फायद्यासाठी हा बेकायदेशीर व्यापार मोठ्या प्रमाणावर चालवत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी प्रतापनगर पोलिस ठाण्यात भा.दं.सं . कलम 123, 223, 274, 275, 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









