नागपूर: शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट 5 अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई 20 मे 2025 रोजी रात्री 10.59 वाजता सुरू होऊन 21 मे रोजी पहाटे 2.20 वाजेपर्यंत चालली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून जवळपास साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये अंमली पदार्थ, धारदार शस्त्रसामग्री, मोबाईल फोन्स, मोटारसायकल, रोख रक्कम व अन्य साहित्याचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी साजिद अली उर्फ सज्जु हाफिज अली (वय 38, रा. मुंशी गल्ली, महाल, नागपूर) आणि शेख आमीन शेख रशीद (वय 31, रा. गांजाखेत, तहसील, नागपूर) हे दोघे मिळून मेफेड्रोन (एमडी) नावाचा प्रतिबंधित अंमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने महालमधील मुंशी गल्ली आणि जुनी मंगळवारी येथील मोहसीन इंजिनीयर वर्कसजवळ छापा टाकून ही कारवाई केली.
या छाप्यात सुमारे 90.44 ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत ₹5,42,640/- इतकी आहे. त्याशिवाय आरोपींच्या ताब्यातून इनको कंपनीची लोखंडी कुऱ्हाड, एक स्टील चॉपर, एक स्टील चाकू, Apple 15 Pro मोबाईल, Vivo Y300 मोबाईल, Vertu व Nokia कंपनीचे कीपॅड मोबाईल्स, तीन डिजिटल वजन काटे, रोख रक्कम ₹28,300/-, प्लास्टिकचे झिप लॉक पिशव्या आणि MH 49 BD 8147 नंबरची Activa दुचाकी असा एकूण ₹7,41,990/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा NDPS अंतर्गत कलम 8(क), 22(क), 29, तसेच भारतीय हत्यार कायद्याचे कलम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली असून, आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
युनिट 5 च्या या कारवाईमुळे नागपूर शहरात अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधातील प्रयत्न अधिक गतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून अशा बेकायदेशीर व्यवहारांवर लक्ष ठेवून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.