गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एम.डी. (मेथेड्रोन) पावडर बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून २.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ६ मे २०२५ रोजी दुपारी १.०० ते २.३० दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक हे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये वांछित असलेल्या आरोपी शेख शाहीद शेख कासीम याच्या शोधात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, संजयबाग कॉलनीजवळ शेख शाहीद हा एम.डी. पावडर विक्रीसाठी जवळ बाळगून आहे.
सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी नमूद ठिकाणी धाव घेतली असता, एक संशयित इसम पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख शाहीद शेख कासीम (वय ३५), रा. आयेशा मस्जिद जवळ, राजीव गांधी नगर, यशोधरानगर, नागपूर असे सांगितले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून झिपलॉक पिशवीत सुमारे २५ ग्रॅम एम.डी. पावडर मिळाली. तसेच एक मोबाईल फोन मिळून आला. सदर मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे २,०५,०००/- रुपये इतकी आहे. आरोपीकडून करण्यात आलेल्या चौकशीत त्याने सदर पदार्थ राजीक शेख (रा. अमरावती) या साथीदाराकडून घेतल्याची कबुली दिली. राजीक शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
एम.डी. पावडर विक्रीसारखा गंभीर गुन्हा केल्याबद्दल आरोपीविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २२(ब), २९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक करून पुढील कारवाईसाठी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथक कार्यरत आहे.
ही कार्यवाही पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर व सह पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाई पोनि. गजानन गुल्हाने, सपोनि. मनोज घुरडे, पोहवा. विजय यादव, मनोज नेवारे, शैलेष डोबोले, पवन गजभिये, विवेक अडाऊ, नितीन साळुंखे, मपोहवा. अनुप यादव, नापोअं. गणेश जोगेकर, पोअं. रोहीत काळे व सुभाष गजभिये यांनी संयुक्तपणे पार पाडली.
तपास यापुढेही सुरू असून, अधिक माहिती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.