
बीड– जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी तीर्थक्षेत्री बुधवारी एक गंभीर बोट दुर्घटना घडली. गोदावरी नदी पार करत असताना सुमारे 50 ते 60 भाविकांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तम यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक पुरुषोत्तमपुरी येथे दाखल झाले होते. दर्शनासाठी नदी ओलांडताना बोटींचा वापर केला जातो. याच दरम्यान भाविकांनी भरलेली बोट नदीच्या मध्यभागी पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बोटीत निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोट उलटल्यानंतर अनेक भाविक नदीत पडले, तर काही जण खोल पाण्यात अडकले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत सुमारे 20 भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, काही लहान मुलेही बोटीत असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. बचाव पथके नदीपात्रात कसून शोधमोहीम राबवत आहेत.
पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना नदीमार्गे बोटीने नेण्याची परंपरा आहे. मात्र, सण-उत्सवाच्या काळात वाढलेल्या गर्दीमुळे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




