Published On : Sat, Sep 15th, 2018

नागपूर मेट्रोत प्रवास करताहेत विग्नहर्ता

नागपूर : वर्धा मार्गावरील छत्रपती चौक परिसरात राहणाऱ्या मोहनलाल शिवहरे यांनी ‘मेट्रोत गणराया प्रवास करीत आहेत’, या कल्पनेची आकर्षक सजावट करून सुंदर देखावा तयार केला आहे. शिवहरे यांनी आपल्या कुटुंबियांसह महा मेट्रो नागपूरच्या थीमवर आधारित हा सुंदर देखावा तयार करून नागरिकांना याठिकाणी येण्यास आकर्षित करीत आहेत. शिवहरे यांच्या निवासस्थानी विग्नहर्त्याचे आगमन झाल्यापासूनच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण येत आहेत. येणारा प्रत्येक नागरिक शिवहरे यांच्या मेट्रो थीम वर आधारित सजावटीची प्रशंसा करीत आहेत.

छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे मेट्रो कोचवर विग्नहर्ता विराजमान झाले आहेत. मेट्रोचे विविध स्टेशन यात दाखविण्यात आले आहेत. खेळणीसाठी उपयोगी येणाऱ्या साहित्यापासून मेट्रोचे हुबेहूब पिलर, उड्डाणपूल, लिटिल वूड तसेच मेट्रोशी संबंधित इतर बांधकामाचे स्वरूप आणि त्याची सजावट शिवहरे यांनी तयार केली आहेत. जणू संपूर्ण परिसरचं मेट्रोमय झाल्याचे नागरिक याठिकाणी अनुभवत आहेत.

मोहनलाल शिवहरे गेल्या अनेक वर्षांपासून आकर्षक सजावट करून गणरायाची स्थापना करीत आहेत. यासाठी अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी सन्मानार्थ प्राप्त केले आहेत. यावर्षी देखील त्यांनी नागपूरकरांमध्ये खास चर्चेचा विषय असलेल्या नागपूर मेट्रोची प्रतिकृती म्हणून आकर्षक सजावट केली आहे. उल्लेखनीय म्हणजे मोहनलाल यांच्या घरापासून मेट्रो धावणार असल्याने त्यांना याचे खास आकर्षण आहे. रिच-१ याठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांकडून ते नेहमी मेट्रोची माहिती मिळवत असतात. त्यांच्या अनोख्या संकल्पनेवरूनच त्यांनी यावर्षी अशी सजावट करून सर्वाना आकर्षित केले आहेत.

गणरायासाठी अशी आकर्षक सजावट पाहून बाप्पाचे भक्त कौतुक केल्याशिवाय राहत नाही. मेट्रो थीमवर आधारित झांकी तयार करण्यासाठी मोहनलाल यांच्यासोबत सरोज शिवहरे, शंकर शिवहरे, जया शिवहरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले आहेत. लवकरच महा मेट्रो नागपूरची अधिकारी वर्गाची टिम या आकर्षक झांकीला भेट देणार आहेत.