Published On : Tue, May 5th, 2020

महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे मनपाला पाच हजार ‘फेस शिल्ड’ प्रदान

कोरोनाशी लढा देणा-या योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी सरसावले हात

नागपूर : कोरोनाशी लढा देणारे मनपाचे डॉक्टर्स, परिचारीका, आशा वर्कर आणि अन्य कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी मदतीचे हात पुढे आले आहेत. एमआयडीसी हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे मंगळवारी (ता.५) नागपूर महानगरपालिकेला पाच हजार ‘फेस शिल्ड’ प्रदान करण्यात आले. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे उत्पादन प्रमुख सचिन तारे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सर्व ‘फेस शिल्ड’ सूपुर्द केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच लढा देत आहेत. सर्वसामान्य नागरिक घरी राहून, सोशल डिस्टंसिंगचे पालन करून, मास्क लावून या लढ्यात सहभागी आहेत. तर काही योद्धे स्वत: मैदानात उतरून जीवाची पर्वा न करता कोरोना हरविण्यासाठी अहोरात्र काम करीत आहे. मनपाच्या आरोग्य विभागाची चमू ही सुद्धा कोरोनाविरोधात मैदानात उतरली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, परिचारीका, आशा वर्क, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र कोरोना विरोधात कार्य करीत आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीद्वारे ‘फेस शिल्ड’ तयार करण्यात आले व आरोग्य कर्मचा-यांच्या सुरक्षेकरीता मनपाला प्रदान करण्यात आले.

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्लांट प्रमुख श्रीकांत दुबे, कार्मिक संबंध विभाग प्रमुख अभिजीत कळंबे, व्यवस्थापक (ई.आर.एन.डी.) सुहास पाटील उपस्थित होते.